Coronavirus: विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुख्यमंत्री आणि PM-CARES ला मदत, कोरोनाविरुद्ध लढाईसाठी केली आर्थिक मदतीची घोषणा

विराटने याबाबत ट्विट करून माहिती दिली. विराट-अनुष्का आपल्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे या विषयाबद्दल जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: Getty)

जगभरामध्ये थैमान घातल्यानंतर कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतातही पोहोचला आहे आणि सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 1000 च्या वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर फंडात (PM-CARES Fund) मदत करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. यानंतर अनेक कलाकार, प्रसिद्ध व्यापारी, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता कोरोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. या दरम्यान भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूड अभिनेत्री-पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी देखील मुख्यमंत्री सहायता निधी आणि  प्रधानमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे जाहीर केले आहे. विराटने याबाबत ट्विट करून माहिती दिली. (COVID-19: कोरोना विरुद्ध लढण्यासाठी BCCI चा मदतीचा हात; पंतप्रधान आपत्ती व्यवस्थापन निधीत 51 कोटींचे योगदान)

विराटने म्हटले, "अनुष्का आणि मी पीएम-केयर फंड आणि मुख्यमंत्री रिलीफ फंड (महाराष्ट्र) यासाठी आमची साथ देण्याचे वचन देत आहोत. लोकांचे दु: ख बघून आमची अंतःकरणे मोडत आहेत आणि आम्हाला आशा आहे की आमच्या योगदानामुळे एखाद्या मार्गाने आपल्या सहकाऱ्यांच्या वेदना कमी होण्यास मदत होईल." विराटने केंद्र आणि राज्य सरकारला किती निधी देण्याचे ट्विटमध्ये नमूद केले नाही. यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी 25 लाख, बीसीसीआयने 51 कोटी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने 50 लाख केंद्र आणि राज्य सरकारला देण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानुसार आपल्याला जमेल तेव्हढी रक्कम पी एम केयर फंडात मदत म्हणून जमा करावी. कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी देणगी म्हणून दान देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तेंडुलकरसह सुरेश रैना, पीव्ही सिंधू, रिचा घोष आणि बजरंग पुनिया यांनी पैशाची देणगी देऊन कोरोनाविरुद्ध मदतीचा हात पुढे केला आहे. बाहुबली फेम अभिनेता प्रभास 4 कोटी, पवन कल्याण 2 कोटी, महेश बाबू 1 कोटी, अल्लू अर्जुन 25 लाख, राम चरण 70 लाख आणि रजनीकांत यांनी 50 लाख रुपये दैनंदिन मजुरांना मदत करण्यासाठी दिले.