Lockdown काळात वडिलांना सायकलवर घेऊन 7 दिवसांत 1200 कि.मी प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीला सायकलिंग फेडरेशन देणार संधी

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्योतीने ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केली, तर राष्ट्रीय सायकलिंग अकादमीच्या कॉम्प्लेक्स मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून तिची निवड होऊ शकते.

15 वर्षीय ज्योती कुमारी (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनचा (Lockdown) सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजुरांची अवस्था या काळात अत्यंत वाईट झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांना घरी पोहचवण्यासाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस ट्रेनचीही व्यवस्था केली. मात्र अद्याप अनेक मजूर कामगार आणि कुटुंब आहेत जे पायी किंवा मिळेल त्या वाहनाने जीवघेणा प्रवास करत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक 15 वर्षीय ज्योती कुमारीचा (Jyoti Kumari) व्हिडिओ व्हायरल झाला होता. लॉकडाउन काळात गुरुग्राममध्ये कामासाठी राहत असलेल्या 15 वर्षीय ज्योतीने आपल्या वडिलांना मागच्या सीटवर बसवत गुरुग्राम (Gurugram) ते बिहार (Bihar) असं 1200 किलोमीटरचं अंतर अवघ्या 7 दिवसांत पूर्ण केलं. तिने घेतलेल्या या अपार कष्टाचं आता फळ तिला मिळण्याची शक्यता आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (Cycling Federation of India) ज्योतीला चाचणीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. (Lockdown: स्थलांतरित मजूरांच्या मदतीस भारतीय क्रिकेटपटू उतरला रस्त्यावर; मित्र, शेजारी आणि पोलिसांच्या मदतीने कामगारांना करतोय अन्न-पाण्याचे वाटप)

“ज्योतीने ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केली, तर राष्ट्रीय सायकलिंग अकादमीच्या कॉम्प्लेक्स मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून तिची निवड होऊ शकते,” सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी पीटीआयला माहिती दिली. जर तिने यशस्वीरीत्या ट्रायल पूर्ण केले तिला विशेष प्रशिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाईल. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या तत्वाखाली ही अकादमी ही आशिया खंडातील अत्याधुनिक सुविधा आहे आणि या खेळाच्या जागतिक संघटनेच्या यूसीआयची मान्यताही प्राप्त आहे. “आम्ही आज सकाळी त्या मुलीशी बोललो आणि आम्ही सांगितले की लॉकडाउन उठताच तिला पुढच्या महिन्यात दिल्लीला बोलावण्यात येईल. तिच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि इतर सर्व खर्च आम्ही उचलणार आहोत. तिला आपल्यासोबत कोणाला घेऊन यायचं असेल तर आम्ही त्याचीसुद्धा परवानगी देऊ. बिहारच्या युनिट युनिटशी सल्लामसलत करून तिला दिल्ली येथे ट्रायलसाठी कसे आणता येईल याविषयी चर्चा करू," असे सिंह म्हणाले.

ज्योतीचे वडील मोहन पासवान, गुडगावमध्ये ऑटोरिक्षा चालक आहे आणि लॉकडाउनमुळे उत्पन्नाचेकाहीच स्रोत न मिळाल्याने त्यांना ऑटो रिक्षा मालकाकडे परत करावी लागली. आपल्याकडे उरलेल्या पैशांनी सायकल घेऊन बाप-लेकीने 10 मे रोजी गुडगाव येथून प्रवास सुरु केला आणि 16 मे रोजी त्यांच्या गावी पोहोचले.