अबुधाबी T10 मधील पुणे डेव्हिल्स फ्रँचायझीशी संबंधित आठ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप; अष्टपैलू खेळाडू Nasir Hossain चाही समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आठ खेळाडू, अधिकारी आणि काही भारतीय संघ मालकांवर 2021 एमिरेट्स T10 लीग दरम्यान भ्रष्ट कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल विविध आरोप लावले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने (ACU) बांगलादेशचा क्रिकेटपटू नासिर हुसेनवर संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबू धाबी टी-10 लीगमध्ये खेळताना भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला आहे. नासिर हुसेनसह आठ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आठ खेळाडू, अधिकारी आणि काही भारतीय संघ मालकांवर 2021 एमिरेट्स T10 लीग दरम्यान भ्रष्ट कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल विविध आरोप लावले आहेत. यामध्ये पराग संघवी आणि कृष्ण कुमार या दोन भारतीय सह-मालकांचा समावेश आहे. हे दोघेही पुणे डेव्हिल्स संघाचे सह-मालक आहेत.
आरोप असलेल्या लोकांमध्ये नसीर, कृष्ण कुमार चौधरी, पराग संघवी यांच्या व्यतिरिक्त रिझवान जावेद आणि सलिया सामन (दोन देशांतर्गत खेळाडू), तसेच अशर झैदी (फलंदाजी प्रशिक्षक), सनी धिल्लॉन (सहाय्यक प्रशिक्षक) आणि शादाब अहमद (संघ व्यवस्थापक) यांचा समावेश आहे.