World Economic Forum: जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे तीन दिवसांत सुमारे 80 हजार कोटींचे करार पूर्ण
इंडोनेशियाच्या एशिया पल्प अँड पेपर कंपनीने रायगड जिल्ह्यात सुमारे 1.5 बिलियन यूएसडी गुंतवणुकीसाठी करार केला
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. आज ऊर्जा निर्मिती क्षेत्रात 50 हजार कोटींचे करार करण्यात आले. यानिमित्ताने तीन दिवसांत सुमारे 80 हजार कोटींचे करार पूर्ण झाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. ऊर्जा निर्मितीसाठी 50 हजार कोटी गुंतवणूक करण्यासाठी रि न्यू पॉवर कंपनीने राज्य शासनासोबत करार केला. कंपनीचे संचालक सुमंत सिन्हा उपस्थित होते. याद्वारे राज्यात दहा ते 12 हजार मेगावॅट ऊर्जा निर्माण होणार आहे. याशिवाय आज इंडोनेशियाच्या एशिया पल्प अँड पेपर कंपनीने रायगड जिल्ह्यात सुमारे 1.5 बिलियन यूएसडी गुंतवणुकीसाठी करार केला. याशिवाय वेदांता ग्रुपचे संचालक अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीसंबधी अमरा राजा ग्रुपचे संचालक जय गल्ला यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.