Regulations for App-Based Vehicles: महाराष्ट्र सरकार लवकरच सादर करणार अॅप-आधारित वाहनांसाठी नियमावली; नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन
सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावलीचा मसूदा तयार करण्यासाठी राज्य शासनाद्वारे समिती स्थापन करण्यात आली आहे.
ओला, उबर सारख्या ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. यासंदर्भात मसूदा तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय विचारात घेण्यात येणार असून नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ओला, उबर व इतर ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी ॲप आधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर जनतेकरीता उपलब्ध आहेत. त्या विचारात घेऊन या वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची बाब राज्य शासनाच्या कार्यवाहीखाली आहे. तसेच सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावलीचा मसूदा तयार करण्यासाठी राज्य शासनाद्वारे समिती स्थापन करण्यात आली आहे.
याविषयी नागरिकांनी अभिप्राय/मत dycommr.enf1@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अथवा संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्षरित्या शनिवार दि. २० मे २०२३ पर्यंत सादर करावेत. प्राप्त मते व अभिप्राय विचारात घेऊन सूचना अंतिम करण्याविषयी शासनातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (प) यांनी कळविले आहे. (हेही वाचा: मुंबई मध्ये G20 Meetings च्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून फ्लाईंग अॅक्टिव्हिटी वर बंदी)