Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा विमानसेवेवर परिणाम; दोन उड्डाणे वळवली, SpiceJet ने दिला विलंबाचा इशारा
अशाप्रकारे कंपनीने संभाव्य विलंबाबाबत पॅसेंजर ॲडव्हायझरी जारी केली.
Mumbai Rains: सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. शहराला उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्थेवर झाल्याचे दिसत आहे, विशेषतः विमान सेवा चांगलीच प्रभावित झाली आहे. प्रतिकूल हवामानामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. खराब हवामानाच्या परिस्थितीमुळे दोन उड्डाणे वळवली गेली, तर सात विमानांना मुंबई विमानतळावरच फिरावे लागले. फ्लाइट रडारच्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 15 उड्डाणे उशीराने पोहोचली.
स्पाइसजेटने सांगितले की, मुंबईमधील खराब हवामानामुळे सर्व निर्गमन/आगमन आणि त्यांच्या परिणामी उड्डाणे प्रभावित होऊ शकतात. अशाप्रकारे कंपनीने संभाव्य विलंबाबाबत पॅसेंजर ॲडव्हायझरी जारी केली. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरही मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला, भांडुप आणि विक्रोळी येथे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने मध्य रेल्वेच्या (CR) मार्गावर गाड्यांसाठी एक तासाचा विलंब झाला. भारतीय हवामान खात्याने गुरुवारसाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. (हेही वाचा: Mumbai Weather Update: मुंबईला पावसाने झोडपले; रस्त्यांना नदीचे स्वरूप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी)
मुंबईतील पावसाचा विमानसेवेवर परिणाम-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)