जीएसटी विभागाची मोठी कारवाई; भिंतीत सापडली 10 कोटींची रोकड आणि 19 किलो चांदीच्या विटा

जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आढळली

जीएसटी (Photo Credits: PTI)

मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले. त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 19 किलो वजनाच्या (13 लाख रुपये किमतीच्या) चांदीच्या विटा आढळून आल्या.

राज्य जीएसटी विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)