'धमक्यांना भीक घालत नाही, संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच व्हायला हवी कारवाई; Eknath Shinde यांची मागणी

पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर राहिल्याचे कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई केली आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात नवा राजकीय वाद सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन आमदारांचा एक मोठा गट गुवाहाटी येथे मुक्कामास आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अशात आज शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी कायदेशीर पेटिशन दाखल केली आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर राहिल्याचे कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई केली आहे.

शिवसेनेच्या या कारवाईला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.’ महत्वाचे म्हणजे यावेळी त्यांनी #RealShivsainik असा हॅशटॅग वापरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)