आईची हत्या करून अवयव भाजून खाणाऱ्या व्यक्तीला मिळाली विशेष सवलत; मुलीच्या लग्नात होणार सहभागी, Bombay High Court चा निर्णय
सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही आणि ही हत्या मद्यधुंद अवस्थेत करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आईच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीला त्याच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपीला पोलिसांच्या बंदोबस्तात लग्नसोहळ्यात नेण्यात येणार आहे. सुनील रामा कुचकोरवी नावाच्या व्यक्तीवर त्याच्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. सुनीलवर या मृतदेहाचे काही अवयव भाजून खाल्ल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. ट्रायल कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे.
आता सुनीलने मुलीच्या लग्नासाठी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, ज्यावर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही आणि ही हत्या मद्यधुंद अवस्थेत करण्यात आली आहे. आरोपीला एका आठवड्याचा जामीन देण्याची विनंती वकिलाने न्यायालयाला केली, जेणेकरून तो मुलीच्या लग्नाला उपस्थित राहू शकेल. त्यावर न्यायालयाने सांगितले की, ते जामीन देऊ शकत नाहीत, परंतु ते आरोपीला पोलीस बंदोबस्तात मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी देऊ शकतात.