Andhra Pradesh Train Accident: आंध्र प्रदेशमध्ये ट्रेनचा भीषण अपघात; दोन प्रवासी गाड्यांची धडक, 6 ठार, 30 पेक्षा जास्त लोक जखमी (Video)

यावेळी घटनास्थळी वीज नसल्याने बचाव कार्यात मोठी अडचण येत आहे.

Andhra Pradesh Train Accident

आंध्र प्रदेशातील विझियानगरम (Vizianagaram) जिल्ह्यातील कोठावलसा तालुक्यात अलमांडा-कंटकपल्ली येथे मोठा रेल्वे अपघात झाला आहे. विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. ओव्हरहेड केबल तुटल्याने रायगडा पॅसेंजर ट्रेन रुळावर थांबली. मात्र, त्याचवेळी आलेल्या पलासा एक्स्प्रेसने रायगड गाडीला मागून धडक दिली. परिणामी रायगड पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले आहे. यावेळी घटनास्थळी वीज नसल्याने बचाव कार्यात मोठी अडचण येत आहे. डब्यांमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असल्याने अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. सर्व जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले. जखमींना नेण्यासाठी पुरेशा संख्येने रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या अपघातामधील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना रु. 50,000 च्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा: Kerala Convention Centre Blast: कोचीच्या रहिवाशाने स्वीकारली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी; पोलिसांसमोर आत्मसमर्पण)