'अल्पसंख्याक कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळणार 7.5 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज'- मंत्री नवाब मलिक

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. मंत्री मलिक म्हणाले, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत सध्या एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याकरिता 5 लाख रुपये इतकी कर्ज मर्यादा आहे, ती वाढवून आता 7 लाख 50 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलातही राज्य शासनाने आता 700 कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)