Fellowships For Ph.D. Students: 'सारथी’ आणि ‘महाज्योती’च्या पीएचडी विद्यार्थ्यांना मिळणार 100% स्कॉलरशिप; राज्य सरकारचा मोठा निर्णय

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता.

Scholarships | |Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र सरकारने ओबीसी, एनटी, व्हीजे आणि एसबीसी प्रवर्गातील पीएचडी विद्यार्थ्यांसाठी पूर्ण 100% फेलोशिप जाहीर केली आहे. सरकारकडून मिळणारे हे आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी फायदेशीर ठरणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाहेर (महाज्योती) केलेले आंदोलन मागे घेतले आहे. ‘सारथी’संस्थेच्या दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि ‘महाज्योती’च्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ अदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असून इतिवृत्त मान्यतेची वाट न पाहता यासंबंधीचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बार्टी’प्रमाणे ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनांही आता नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार असल्याने संबंधित विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे त्याबद्दल आभार मानले आहेत. (हेही वाचा: MPSC Result 2024 For Group B & C Posts: एमपीएससीने जाहीर केले गट ब आणि क परीक्षेचे निकाल; www.mpsc.gov.in वर पाहू शकाल, जाणून घ्या सविस्तर)

'सारथी’ आणि ‘महाज्योती’च्या पीएचडी विद्यार्थ्यांना मिळणार 100% स्कॉलरशिप-