Fact Check: 1990-2020 दरम्यान काम केलेल्या कर्मचार्यांना केंद्रीय श्रम मंत्रालय 120000 रुपये देणार असल्याचं वृत्त खोटं; जाणून घ्या व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेज मागील सत्य
मात्र आता PIB Fact Check या भारत सरकारची माहिती देणार्या अधिकृत संस्थेकडून मात्र हे वृत्त खोटं आणि निराधार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतामध्ये 24 मार्च पासून जाहीर झालेला लॉकडाऊन आता लवकरच चौथ्या टप्प्यात जाणार आहे. दरम्यान या लॉकडाऊनमुळे अनेक जण घरात बसून असल्याने सोशल मीडियातच मनोरंजन आणि टाईमपास केला जातो. सध्या जगभरातून माहितीचा भडीभार होत असल्याने गोष्टींची सत्यता न तपासताच काही गोष्टी, मेसेज फॉरवर्ड करण्याचं वाढलं आहे. दरम्यान आता व्हॉट्सअॅपवर 1990-2020 या दहा वर्षाच्या काळात काम केलेल्या लोकांना केंद्रीय श्रम मंत्रालय एक लाख 20 हजार रूपये देणार असल्याची घोषणा केल्याचं वृत्त व्हायरल होत आहे. मात्र आता PIB Fact Check या भारत सरकारची माहिती देणार्या अधिकृत संस्थेकडून मात्र हे वृत्त खोटं आणि निराधार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये देण्यात आलेली वेबसाईटदेखील बनावट असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
भारतामध्ये कोरोना व्हायरसचं संकट गडद आहे. यादरम्यान सामन्य नागरिक, गोर गरिब यांची बिकट स्थिती पाहता सरकारने आत्मानिर्भर भारत चा नारा देत आपण स्वयंपूर्ण होणं गरजेचे आहे असं सांगत 20 लाख कोटी रूपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. यामध्ये लघू, मध्यम उद्योग ते नोकरदारांना होणारा फायदा काल अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आला. मात्र यामध्ये कुठेही विशिष्ट कामगारांना लाखो रूपयांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सरकारी माहितीशिवाय इतर ठिकाणाहून समोर येणारी माहिती तपासून पाहण्याचं आवाहन केलं आहे.
PIB Fact Check News
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 78 हजारांच्या पार गेला आहे. सध्या कोरोनावर मात करण्यासाठी कोणताही ठोस उपाय, लस नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून काळजी घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत. सरकारी नियमावलीचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.