'188-year-old' Man Rescued Fact-Check: बंगळुरु येथील गुहेत खरोखरच आढळला 188 वर्षांचा वृद्ध व्यक्ती? व्हायरल व्हिडिओचे सत्य काय?
मध्य प्रदेशातील सियाराम बाबा म्हणून ओळखला जाणारा वृद्ध व्यक्ती प्रत्यक्षात 110 वर्षांचा आहे. दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमागील सत्य घ्या जाणून.
बेंगळुरूजवळच्या एका गुहेतून एका 188 वर्षीय वृद्ध व्यक्तीला (188-year-old Man) वाचवण्यात आल्याचा दावा करणारा एक कथीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत असून, असाही दावा केला जात आहे की, हा व्यक्ती म्हणजे मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील सियाराम बाबा (Siyaram Baba) नावाचे 110 वर्षीय हिंदू संत आहेत. एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर कन्सर्न्ड सिटीझन या वापरकर्त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याला सुमारे 2 कोटी 90 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, दोन पुरुष कुबड्या, पांढरी दाढी आणि चालण्याची काठी असलेल्या एका कमकुवत वृद्ध व्यक्तीला मदत करताना दिसत आहेत. व्हिडिओसोबतच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहेः "हा भारतीय माणूस नुकताच एका गुहेत सापडला आहे. ते 188 वर्षांचे असल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावरील दाव्याची पडताळणी
एक्स या मंचावर हा व्हिडिओ जसजसा व्हायरल होत गेला, तसतशी चर्चा वाढू लागली. एक्सवर अनेकांनी हा दावा फेटाळला. ज्यामध्ये म्हटले आहे की, लाइव्हमिंटने आपल्या वृत्तात नमूद केले आहे की, सदर वृद्ध व्यक्ती भारतातील मध्य प्रदेशात राहणारा 'सियाराम बाबा' नावाचा हिंदू संत आहे, असा दावा करण्यात आला असला तरी, आम्ही त्यांचे वय आणि सोशल मीडियावरील दावे यांची पडताळणी करु शकलो नाही.
हेच ते बाबा जे व्हायरल झाले
सियाराम बाबा नावाचे संत
डेटा पडताळणी समूह अशी ओळख असलेल्या डी-इंटेंटसह अनेक वस्तुस्थिती तपासणाऱ्या संस्थांनी हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. आपल्या विश्लेषणात, डी-इंटेंटने म्हटले, "काही लोक एका वृद्ध व्यक्तीला मदत करत असल्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की एक 188 वर्षीय भारतीय माणूस नुकताच एका गुहेत सापडला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की हे दावे खरे नाहीत. वृद्ध व्यक्ती 'सियाराम बाबा' नावाचा संत आहे, जो मध्य प्रदेशात राहतो. डी-इंटेंटने यावरही भर दिला की सोशल मीडिया प्रभावक अनेकदा लक्ष वेधून घेण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी अतिशयोक्तीपूर्ण किंवा "स्वयं-शोधलेल्या" दाव्यांसह असे व्हिडिओ प्रसारित करतात.
डी-इंटेटकडून व्हायरल व्हिडिओची पुष्टी
दरम्यान, या व्यक्तीची खरी ओळख 2 जुलै 2024 रोजीच्या नवभारत टाईम्सच्या एका लेखाद्वारे पुष्टी करण्यात आली, ज्यात व्हिडिओमधील वृद्ध व्यक्तीची ओळख मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात राहणारे संत सियाराम बाबा अशी करण्यात आली होती. अहवालात म्हटले आहे की ते 109 वर्षांचे आहेत, व्हायरल व्हिडिओमध्ये दावा केल्याप्रमाणे 188 वर्षांचे नाहीत.
व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्यास पश्चाताप
व्हायरल झालेल्या पोस्टचे मूळ निर्माते, कन्सर्न्ड सिटीझन यांनी नंतर एका टिप्पणीमध्ये झालेली चूक मान्य केली आणि लिहिलेः "मी 188 लिहिल्याबद्दल मला लाज वाटते. 120 पेक्षा जास्त काहीही हास्यास्पद ठरले असते.
पडताळणीतील तथ्य
बेंगळुरूजवळच्या गुहेतून 188 वर्षीय वृद्ध व्यक्तीची सुटका केल्याचा व्हायरल दावा फेटाळण्यात आला आहे. वृद्ध व्यक्तीची ओळख मध्य प्रदेशातील 110 वर्षीय सियाराम बाबा अशी झाली आहे. ही घटना सोशल मीडियावर सनसनाटी दाव्यांचा सामना करताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करते.