Sunny Leone's Photo on Exam Admit Card: उत्तर प्रदेश पोलीस परीक्षा प्रवेशपत्रावर सनी लियोनचा फोटो
या कथीत प्रवेशपत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रवेशपत्राची नोंदणी उत्तर प्रदेश पोलीस भरती एवं पोन्नती बोर्ड (UPPRB) च्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आली होती.
उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षा (UP Constable Recruitment Exam 2024) प्रवेशपत्रावर चक्क अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) हिचा फोटो नावासकट छापल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येतो आहे. या कथीत प्रवेशपत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रवेशपत्राची नोंदणी उत्तर प्रदेश पोलीस भरती एवं पोन्नती बोर्ड (UPPRB) च्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आली होती. ही परीक्षा यूपीपीआरबीने शनिवार म्हणजेच 17 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील एकूण 75 जिल्ह्यांमधील 2,385 परीक्षा केंद्रांवरआयोजित केली होती. व्हायरल झालेल्या प्रवेशपक्षानुसार सनी लियोन (Sunny Leone's Photo on Admit Card) हिचे परीक्षा केंद्र श्रीमती सोनेश्री मेमोरियल गर्ल कॉलेज होते. जे कन्नौज येथील तिर्वा तालुक्यात येते.
UPPRB द्वारा तातडीने खुलासा
प्रवेशपत्रावर सनी लियोन हिचा फोटो परीक्षाकेंद्र, परीक्षेची वेळ (12.05) असा सर्व तपशील पाहायला मिळतो. UPPRB द्वारा नोंदणी करण्यात आलेल्या संकेतस्थळानुसार या प्रवेशपत्राचा नोंदणी क्रमांक 12258574 असा होता. व्हायरल प्रवेशबत्राबाबत माहिती मिळताच UPPRB द्वारा तातडीने खुलासा करण्यात आला. त्यांनी हे प्रवेशपत्र फेक असल्याचे जाहीर केले. UPPRB अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेच्या अर्जादरम्यान, उमेदवाराने चुकीचे फोटो अपलोड केले होते आणि तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, भरती मंडळाने लगेचच रिक्त फोटो विभाग अपलोड करून ही कार्डे दुरुस्त केली. दरम्यान, कन्नौज पोलिसांच्या सायबर विभागाने याबाबत चौकशी सुरु केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबलच्या 60,244 पदांसाठी परीक्षा
उत्तर प्रदेश पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा शनिवारपासून सुरू झाली. पोलीस कॉन्स्टेबलच्या 60,244 पदांसाठी ही परीक्षा उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांमध्ये दोन सत्रात घेतली जात आहे. वृत्तसंस्था पीटीआयने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, परीक्षेत उमेदवारांची तोतयागिरी केल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांत राज्यभरात 120 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
परीक्षा तोतयागिरी प्रकरणी 122 जणांना अटक
पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रशांत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, एकूण 122 अटक करण्यात आलेल्यांपैकी 15 एटा, मऊ, प्रयागराज आणि सिद्धार्थनगरमध्ये प्रत्येकी नऊ, गाझीपूरमध्ये आठ, आझमगडमध्ये सात, गोरखपूरमध्ये सहा, जौनपूरमध्ये पाच, चार जणांचा समावेश आहे. फिरोजाबादमध्ये, कौशाम्बी आणि हाथरसमध्ये प्रत्येकी तीन, झाशी, वाराणसी, आग्रा आणि कानपूरमध्ये प्रत्येकी दोन आणि बलिया, देवरिया आणि बिजनौरमध्ये प्रत्येकी एकास अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये आढळणाऱ्या त्रुटी, व्हायरल झालेले प्रवेशपत्र, पुढे येत असलेली तोतयागिरी यांवर तरुणांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला परीक्षेदरम्यान होत असलेल्या अनुचीत प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कारवाईचा बडगा उगरत आहे.