TikTok Star Sandhya Chauhan Dies by Suicide: सिया कक्कड़ नंतर टिकटॉक स्टार संध्या चौहान हिची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

सिया कक्कड़ या टिकटॉक स्टारच्या आत्महत्येची बातमी ताजी असताना अजून एका तरुण टिकटॉकरने आत्महत्या केल्याने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.

Sandhya Chauhan (Photo Credits: Twitter)

टिकटॉक (TikTok) स्टार संध्या चौहान (Sandhya Chauhan) हिने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात 16 वर्षीय सिया कक्कड़ (Siya Kakkar) या टिकटॉक स्टारने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता संध्याच्या आत्महत्येची माहिती समोर आली आहे. संध्या हि दिल्ली (Delhi) मधील ग्रीन पार्क (Green Park) येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. संध्या दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थ्यींनी असून भारत सरकारने टिकटॉक बॅन केल्याने ती अत्यंत नाराज होती. दरम्यान तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. संध्याच्या मोबाईलची तपासणी करुन तिच्या आत्महत्येसंबंधित काही माहिती समोर येते का, हे ही पाहिले जाणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, संध्याने आत्महत्या केली तेव्हा घरात केवळ तिची आईच होती. संध्याच्या आत्महत्येची माहिती तिच्या कझिनने पोलिसांना दिली. त्यानंतर मोदीपुरम आऊटपोस्टचे इनचार्ज विकास चौहान हे तिच्या घरी पोहचले आणि बेडरुमचा दरवाजा तोडून तिला तातडीने जवळच्या एसडीएस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र हॉस्पिटलमध्ये तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. (टिकटॉक स्टार सिया कक्कड हिची आत्महत्या; 16 व्या वर्षीच संपवले जीवन, पहा तिचे Video)

तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी घरात असलेल्या वादामुळे तिने हे पाऊल उचलले असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान तिच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून संध्या नैराश्यात होती मात्र त्याचे कारण आम्हाला ठाऊक नाही, असे कुटुंबियांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. 14 जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यापूर्वी सुशांतच्या पूर्वीच्या मॅनेजरच्या आत्महत्येची वार्ता समोर आली होती. परंतु. 16 वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्कड़ हिने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच संध्या चौहान हिच्या आत्महत्येची घटना समोर आली. त्यामुळे भारत सरकारने टिकटॉक बॅन करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे टिकटॉक स्टार आत्महत्या करत असल्याचे म्हटले जात आहे.