Lockdown in India: देशात 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा? PIB Fact Check ने सांगितले व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत सत्य
यामुळे लोकांमध्ये अधिक संभ्रम आणि भीती निर्माण होत आहे.
देशात कोरोना विषाणू (Coronavirus) साथीचा रोग आणि वेगाने पसरणार्या संसर्गाच्या दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो ‘ब्रेकिंग' न्यूज म्हणून शेअर केला जात आहे. या फोटोमध्ये सांगितले आहे की, 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान देशात लॉकडाउन (Lockdown) लादले जाईल. कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये सोशल मीडियावर आजकाल अशा अनेक बातम्या पाहायला मिळत आहेत, ज्यात दिशाभूल करणारे दावे केले जात आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर लॉकडाऊनबद्दल बनावट बातम्यांचा आणि माहितीचा पूर आला आहे. आता सरकारने ही लॉकडाऊनची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगत, अशा चुकीची माहिती देणाऱ्या बातम्यांपासून सावध रहायला सांगितले आहे.
अनेकांनी हा फोटो ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून सोशल मिडियावर शेअर केला आहे. 15 ते 30 एप्रिल दरम्यान संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केले आहे, असे या फोटोमध्ये लिहिले आहे. सोबत पीएम नातेन्द्र मोदी यांचा फोटोही दिसत आहे, त्यामुळे अनेकांनी या बातमीवर विश्वास ठेवला आहे.
शासकीय संस्था, प्रेस इनफॉरमेशन ब्यूरो (PIB) या फोटोचे विश्लेषण करून त्यामध्ये दिलेली माहिती बनावट असल्याचे सांगितले आहे. पीआयबीने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, मॉर्फेड फोटोमध्ये असा दावा केला जात आहे की भारत सरकार 15 ते 30 एप्रिल दरम्यान देशभरात लॉकडाउन लागू करेल. मात्र हा दावा खोटा आहे. लॉकडाऊनबाबत भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. कृपया अशी दिशाभूल करणारे फोटो किंवा मेसेजेस शेअर करू नका. (हेही वाचा: सरकारी रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या मास्कमुळे लोक बेशुद्ध पडत आहेत? जाणून घ्या या व्हायरल ऑडिओमागील सत्यता)
दरम्यान, बर्याच दिवसांपासून असे दिसून येत आहे की, लोक अशी दिशाभूल करणारे फोटो किंवा बातम्या यांची सत्यता जाणून न घेता वेगाने फॉरवर्ड करत आहेत. यामुळे लोकांमध्ये अधिक संभ्रम आणि भीती निर्माण होत आहे. कोरोना कालावधीत लोकांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने या गोष्टी टाळण्याचे आवाहन केले आहे.