धक्कादायक: चायनीज रेस्टॉरंटमधून मागवलेल्या अन्नात सापडला मानवी दात; हॉटेलकडून स्टाफची DNA चाचणी

कधी अस्वच्छता तर कधी अन्नपदार्थात इतर गोष्टींची मिसळण, यामुळे तुम्हाला घराबाहेर चांगले जेवण मिळेल ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल बाहेरचे अन्न आरोग्यदायी असते या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. कधी अस्वच्छता तर कधी अन्नपदार्थात इतर गोष्टींची मिसळण, यामुळे तुम्हाला घराबाहेर चांगले जेवण मिळेल ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आता एका चायनीज रेस्टॉरंटमधून (Chinese Restaurant) घरी मागवलेल्या जेवणात चक्क मानवी दात (Human Teeth) सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. होय, हे ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल, मात्र हे सत्य आहे. या प्रकरणातील चौकशीनंतर, रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकारानंतर रेस्टॉरंटच्या मॅनेजरने सांगितले आहे की, इथले सर्व कर्मचारी डीएनए चाचणी करून घेण्यास तयार आहेत. यावरून अन्नात सापडलेला दात त्यांचा नाही हे सिद्ध होऊ शकते. रेस्टॉरंटच्या अन्नात मानवी दात सापडण्याची ही घटना वर्सेस्टर (Worcester), इंग्लंड येथील आहे. इथल्या जोडप्याने चायनीज रेस्टॉरंटमधून पोर्क करी मागवली होती. मात्र जेव्हा ते खाण्यासाठी बसले तेव्हा त्यांच्या जेवणात मानवी दात आढळला.

याबाबत या जोडप्याने तक्रार केल्यानंतर, स्थानिक अधिका्यांनी रेस्टॉरंटची तपासणी केली. त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये सुरक्षेचे कोणतेही नियम मोडलेले नसल्याचे आढळले. त्या आधारावर या रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई न करण्याचा व रेस्टॉरंटचे रेटिंग न कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेस्टॉरंटचे रेटिंग 4.5 आहे. मात्र रेस्टॉरंटने या बदल्यात या जोडप्याना विनामूल्य अन्न आणि परतावा देऊ केला. जोडप्याने विनामूल्य अन्न घेण्यास नकार दिला. (हेही वाचा: रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी बनवण्याचा किळसवाणा प्रकार; दुकानदारावर कारवाई)

दरम्यान, मागच्या वर्षी मुंबईत लिंबू पाणी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यानेच, लिंबू सरबत बनवणारी व्यक्ती हात धूत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये तो एका अस्वच्छ पाण्याच्या टाकीतून पाणी घेऊन तो लिंबू सरबत बनवत असल्याचे दिसत होते. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून त्या विक्रेत्यावर बंदी घातली गेली. तसेच त्याच्या लिंबू सरबताची चाचणी केली असता, आरोग्यास बाधा निर्माण होणारे घटक आढळले, त्यामुळे या विक्रेत्यास मध्य रेल्वे प्रशासनाकडून पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.