Covid-19 रुग्णांना cheer करण्यासाठी आरोग्य सेवकांचा PPE कीट घालून भांगडा; पहा Viral Video
कोरोनाबाधित रुग्णांना चीयर करण्यासाठी आरोग्य सेवकांनी पीपीई कीट घालून भांगडा केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) वाढते संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अनेकांचे मानसिक आणि भावनिक खच्चीकरण झालेले आहे. कोरोना रुग्ण तर फार गंभीर परिस्थितीतून जात असतात. उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अनेक दिवस कुटुंबापासून लांब राहावे लागते. यामुळे शारीरिक त्रासासोबतच मानसिकदृष्ट्याही उदासिनता येण्याच्या अधिक शक्यता असते. अशा कोविड-19 रुग्णांच्या आयुष्यात हास्याची लकेर आणण्याचा प्रयत्न आरोग्य सेवकांनी केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना चीयर करण्यासाठी आरोग्य सेवकांनी पीपीई (PPE) कीट घालून भांगडा केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत आरोग्य सेवक पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यामुळे कोरोना रुग्णांचा उत्साह देखील वाढला आहे. आपल्या बेडवरुनच रुग्ण गाण्यावर थिरकत आहेत आणि आनंद घेत आहेत. हा व्हिडिओ गुरमीत चड्ढा नामक व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "अद्भूत स्पिरीट. आपल्या डॉक्टर्स आणि आरोग्य योद्धांना सलाम! चेहऱ्यावर हास्य फुलवले."
पहा व्हिडिओ:
मागील वर्षापासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरस संकटात आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोनाचे संकट आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली. मात्र या काळातही कोरोना योद्धे जीवाची पर्वा न करता झटत आहेत. दरम्यान, या संकटाचा मोठा ताण त्यांच्यावर असताना देखील रुग्णसेवेसाठी कर्तव्यापलीकडे जात ते कार्य करत आहेत.