धक्कादायक! Jharkhand येथे 17 वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढला 7 किलो वजनाचा Hairball; लहानपणापासून केस खाण्याची होती सवय

येथे शस्त्रक्रिया करून 17-वर्षीय मुलीच्या पोटातून 7 किलो वजनाचा एक केसांचा गोळा (Hairball) काढण्यात आला आहे. मुलीवर ऑपरेशन करणार्‍या सर्जनने सांगितले,

Surgery (Photo Credits: Pexels)

झारखंडच्या (Jharkhand) बोकारो जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे शस्त्रक्रिया करून 17-वर्षीय मुलीच्या पोटातून 7 किलो वजनाचा एक केसांचा गोळा (Hairball) काढण्यात आला आहे. मुलीवर ऑपरेशन करणार्‍या सर्जनने सांगितले, की केसांचा हा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला गेला आहे. हे एक अतिशय गुंतागुंतीचे ऑपरेशन होते कारण केसांनी या मुलाच्या पोटाचा बराचसा भाग व्यापला होता. हे केस काढून टाकल्यामुळे आता मुलीची प्रकृती ठीक आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसांत तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात येईल.

याबाबत माहिती देताना डॉक्टर म्हणाले की, चास भोजपूर कॉलनीत राहणार्‍या स्वीटी कुमारीला लहानपणापासूनच केस खाण्याची सवय होती. केस पुसल्या नंतर बहुतेकदा ती ते खायची. पाच वर्षांच्या नंतर जरी तिने ही वाईट सवय सोडून दिली असली, तरी पोटातील केस एकाच ठिकाणी गोळा झाले होते. हळूहळू त्याचा गोळा बनायला सुरुवात झाली व त्याने संपूर्ण पोट व्यापून टाकले. दरम्यान, या मुलीला उलट्या आणि गॅसचा त्रास होऊ लागला.

तीन दिवसांपूर्वी ती बीजीएचचे सेवानिवृत्त सर्जन डॉ. जी.एन. साहू यांना भेटली. त्यानंतर डॉक्टर साहू यांनी तिचा अल्ट्रासाऊंड केला. या मुलीच्या पोटात ट्यूमर असल्याचा संशय होता. सोमवारी खासगी रुग्णालयात या मुलीचे ऑपरेशन करण्यात आले. या दरम्यान तिच्या पोटातून केसांचा एक गोळा सापडला, त्याचे वजन सुमारे सात किलोग्रॅम असल्याचे सांगितले जाते. डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या 40 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात पोटात केस जमा होण्याची अशी घटना पाहिली आहे. ही शस्त्रक्रिया पूर्ण होण्यास तब्बल 6 तास लागले. (हेही वाचा: धोका टळला: एक वर्षाचा मुलगा सापाला चावाला, शरीराचा तुकडाच गिळला खेळताना)

दरम्यान, ब्रिटीश मेडिकल जर्नलच्या म्हणण्यानुसार 2018 पर्यंत केवळ 90 अशी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पोटात केस राहिल्याने डिहायड्रेशन, कुपोषण, उलट्या, वेदना आणि आतड्यांसंबंधी इतर समस्या उद्भवू शकतात.