Fact Check: प्लास्टिकच्या कचर्‍याने भरलेल्या नदीचा 'तो' फोटो Mithi River चा नाही; भाजपच्या Priti Gandhi यांनी शेअर केला चुकीचा फोटो

हा फोटो महाराष्ट्रातील मुंबईच्या मिठी नदीचा (Mithi River) असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा फोटो फिलीपिन्समधील (Philippines) असल्याचे समोर आले आहे.

व्हायरल फोटो (Photo Credits: Twitter)

सध्या सोशल मिडियावर प्लास्टिकच्या कचर्‍याने भरलेल्या नदीचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो महाराष्ट्रातील मुंबईच्या मिठी नदीचा (Mithi River) असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा फोटो फिलीपिन्समधील (Philippines) असल्याचे समोर आले आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील नदीची तुलना करण्यासाठी भाजपाच्या महिला विंगच्या सोशल मीडिया कार्यकारी प्रीती गांधी (Priti Gandhi) यांनी ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोद्वारे त्या सांगत आहेत की, मुंबईतील मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र सरकारने 1000 कोटी रुपये खर्च तरीही या नदीची इतकी वाईट स्थिती आहे.

दुसरीकडे, गुजरात सरकारने साबरमती नदीकाठ जवळपास 1400 कोटी रुपये खर्चून साफ केला व आता त्याचा कायापालट झाला आहे. ही तुलना करताना गांधी यांनी मिठी नदीसाठी जो फोटो वापरला आहे त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे, कारण हा फोटो मिठी नदीचा नाही. शटरस्टॉक आणि ड्रीम्स टाईमसारख्या लोकप्रिय ऑनलाइन फोटो लायब्ररीने रॉयल्टी फ्री फोटो म्हणून अपलोड केलेला हा फोटो, अँटोनियो ओकियस यांनी घेतला होता.

बरेच लोक जलप्रदूषणाशी संबंधित बातम्यांमध्ये हा फोटो वापरतात कारण तो विनामूल्य उपलब्ध आहे. हा फोटो यूकेमधील कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या वेबसाइटवरही वापरण्यात आला आहे. फोटो अपलोड करणाऱ्या अँटोनियोने शटरस्टॉक वेबसाइटवर नमूद केले आहे की, हा फोटो 2008 मध्ये फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे घेण्यात आला होता. गुगलवर आपण मनिला नदी प्रदूषण असे सर्च केल्यास आपल्याला हा फोटो आढळेल. त्यामुळे हा फोटो मुंबईच्या मिठी नदीचा नसल्याचे सिद्ध होत आहे. (हेही वाचा: Fact Check: Covid-19 लस घेतलेल्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचा Anesthesia घेऊ नये? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने नुकताच मिठी नदीवर पूर्व-पश्चिम कनेक्टिंग रोड पूल सुरु केला आहे. जुन्या पुलाच्या हा जागी हा नवीन पुल तयार करण्यात आला होता. डिसेंबर 2020 मध्ये जुना पूल पाडण्यात आला होता.