Fact Check: कोरोना विषाणू लस घेण्यासाठी WhatsApp द्वारे स्लॉट बुक करू शकतो? जाणून घ्या काय म्हणते आरोग्य मंत्रालय
या जाहिरातीमध्ये एक फोन नंबरही देण्यात आला आहे
सध्या फक्त शासकीय वेबसाईट्स, सरकारी सोशल मिडिया खाती, सरकारी माहितीपत्रके यांच्यामार्फतच कोरोना लसीकरणाविषयी माहिती दिली जात आहे. मात्र आता समोर आले आहे की, आजकाल जाहिराती, खोटे मेसेज यांच्यामार्फत नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य आणि सार्वजनिक कल्याण मंत्रालयाने अशा खोट्या माहितीपासून सावध राहण्यास सांगितले आहे. बरेच लोक कोरोना विषाणू आणि लसबद्दल खोटी आणि बनावट माहिती पसरवित आहेत. मंत्रालयाने या संदर्भात एक पोस्ट देखील जारी केली आहे.
लसीकरणाच्या बाबतीत प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीमध्ये असा दावा केला गेला आहे की, लोक सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वॉट्सअॅपवरुन कोरोना व्हायरस लस घेण्यासाठी स्लॉट बुक करू शकतात. या जाहिरातीमध्ये एक फोन नंबरही देण्यात आला आहे. या नंबरबाबत सांगितले आहे की, हा केंद्र सरकारच्या कोविन CoWIN लस मॅनेजमेंट सिस्टमशी इंटीग्रेटेड आहे. तसेच याद्वारे लसीकरण स्लॉट एकावेळी चार लोकांसाठी बुक केले जाऊ शकते. या जाहिरातीमध्ये असेही म्हटले आहे की, स्लॉट बुक करताना लोकांना त्यांचे नाव, वय आणि आधार कार्ड तसेच जवळच्या रुग्णालयाचा पिन कोडही द्यावा लागेल. त्यात पुढे म्हटले आहे की, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसर्या डोससाठी पात्र आहेत. (हेही वाचा: सरकारी रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या मास्कमुळे लोक बेशुद्ध पडत आहेत? जाणून घ्या या व्हायरल ऑडिओमागील सत्यता)
आता पीआयबी फॅक्ट चेकने मंत्रालयाद्वारे दिलेल्या माहितीमध्ये ही जाहिरात पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा अन्य जाहिरातींपासूनही सावध राहण्यास सांगितले आहे. याव्यतिरिक्त, मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की, कोणतीही व्यक्ती केवळ CoWIN पोर्टल किंवा आरोग्य सेतु एपद्वारेच लसीकरणासाठी नोंदणी करू शकते.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लोकांना कोरोना विषाणूविषयी जागरुक राहण्याचे व एखाद्या गोष्टीची पडताळणी केल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहान केले आहे.