Fact Check: घरगुती उपचारांनी Covid-19 बरा करताय? व्हायरल झालेले अनेक उपाय ठरले खोटे, समोर आले 'हे' सत्य

सोशल मिडियावर कोरोना बरा करण्याचे अनेक घरगुती उपाय व्हायरल झाले आहेत व आता पीआयबी फॅक्ट चेकच्या (PIB Fact Check) टीमने या दाव्यांमागील सत्य सांगितले आहे.

PIB Fact Check (Photo Credit : Twitter)

देशामध्ये कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट हळू हळू ओसरत आहे, मात्र अजूनही धोका पूर्णतः टळला नाही. अशात सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. केंद्र सरकार वेळोवेळी जनतेला या विषाणूपासून कसे संरक्षण करायचे याबाबत जागरूक करत असते. मात्र अजूनही अनेक लोक घरगुती उपायांनी या व्हायरसवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मिडियावर कोरोना बरा करण्याचे अनेक घरगुती उपाय व्हायरल झाले आहेत व आता पीआयबी फॅक्ट चेकच्या (PIB Fact Check) टीमने या दाव्यांमागील सत्य सांगितले आहे.

सोशल मिडियावर दावा केला होता की, चहा (Tea) पिण्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखता येऊ शकतो आणि यामुळे संक्रमित व्यक्ती लवकर बरी होऊ शकते. त्यावर पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने माहिती दिली आहे की, हा दावा पूर्णतः खोटा आहे. चहा पिल्यास कोविड-19 च्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो यासाठी कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका बातमीत विड्याच्या पानाचे सेवन केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो, असा दावा करण्यात आला होता. परंतु, या माहितीला वैज्ञानिक आधार नसल्याने पीआयबीने ही बातमी फेटाळून लावली आहे. विड्याच्या पानामुळे कोरोना बरा होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनावरील उपचार म्हणून मध, आले आणि मिरपूडचा वापर केला जाऊ शकतो असे एका मेसेजमध्ये म्हटले होते. पुडुचेरी विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने हा उपाय शोधून काढल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर प्रेस इन्फॉरमेशन ब्यूरो ऑफ इंडियाने त्यांच्या फॅक्ट चेक हँडलवर हा दावा फेटाळून लावला आहे. अशा प्रकारच्या उपचारांनी कोरोना बरा होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

नाकामध्ये लिंबूचा रस घातल्याने कोरोना विषाणू निघून जाऊ शकतो, असा दावा एका व्हिडीओमध्ये केला होता. मात्र ही माहिती पूर्णतः चुकीची असल्याचे केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक टीमने सांगितले आहे. याबाबत कोणताही वैज्ञानिक पुरावा नसल्याचे सांगण्यात आले आहे. कच्चा कांदा आणि सैंधव मीठ खाल्याने कोरोना संसर्ग बरा होतो, असा दावाही करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले आहे. (हेही वाचा: COVID-19 Fact Check: कोरोना विषाणू लस घेतल्यावर मास्क लावण्याची गरज नाही? जाणून घ्या अशा अनेक खोट्या दाव्यांमागील सत्य)

तुरटीचे तुमच्या घशाला लागले असेल तर तेथे कोरोना प्रवेश करू शकत नाही असा दावा करणारा एक व्हिडीओ समोर आला होता. पण या दाव्याला वैज्ञानिक आधार नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. तुरटीच्या पाण्याने कोरोना संसर्ग बरा होऊ शकत नाही, असे पीआयबीने सांगितले आहे.

पीआयबी फॅक्ट चेक टीमने सांगितले आहे की, कोरोनावरील उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. असे घरगुती उपचार कधीकधी मदतीऐवजी हानिकारक ठरू शकतात.