Are Ants Attracted to E20 Ethanol-Blended Petrol?: गाड्यांच्या पेट्रोल टाकीला मुंग्या का लागतात? ई२० इथेनॉल पेट्रोल आणि व्हायरल व्हिडिओमागचे सत्य काय?
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यामध्ये गाडीच्या पेट्रोल टाकीभोवती मुंग्यांचा मोठा वेढा दिसतो आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या ई२० (E20) इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे हे घडत असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यामागील वैज्ञानिक सत्य फॅक्ट चेकच्या माध्यमातून समोर आले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या सिक्कीममधील एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका कारच्या इंधन टाकीच्या (Fuel Tank) झाकणाभोवती मुंग्यांचा गराडा आणि मोठी वसाहत पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, भारतात सध्या वापरल्या जाणाऱ्या ई२० (E20) इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांकडे मुंग्या आकर्षित होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इथेनॉल हे प्रामुख्याने उसापासून तयार केले जात असल्याने पेट्रोलला गोडवा येतो आणि त्यामुळे मुंग्या तिथे जमा होतात, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने "आजकाल तुमच्या पेट्रोलमध्ये किती उसाचा रस आहे, हे निसर्गच तुम्हाला सांगत आहे का?" अशी कॅप्शन लिहिली आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ई२० पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान तर होणार नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे.
फॅक्ट चेक: मुंग्या खरोखरच इथेनॉलकडे आकर्षित होतात का?
वैज्ञानिक अभ्यास आणि फॅक्ट चेकनुसार, मुंग्या पेट्रोलमधील इथेनॉलकडे आकर्षित होतात हा दावा सत्य आढळला आहे. मात्र, त्याचे कारण पेट्रोलमधील कोणताही 'गोडवा' नसून त्यामागे वेगळे वैज्ञानिक कारण आहे. इथेनॉलमधून येणारा गंध मुंग्यांसाठी 'फर्मेंटेड शुगर' (आंबवलेली साखर) म्हणजेच त्यांच्या अन्नाचा संकेत देणारा ठरतो. जेव्हा मुंग्यांना या प्रकारचा गंध येतो, तेव्हा त्यांच्या शोध घेण्याच्या प्रवृत्तीत (Exploratory Behavior) मोठी वाढ होते आणि त्या त्या दिशेने आकर्षित होतात.
ई२० पेट्रोल आणि मुंग्यांचा संबंध
भारतात सध्या ई२० पेट्रोलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ई२० पेट्रोल म्हणजे यामध्ये २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के गॅसोलीन (पेट्रोल) यांचे मिश्रण असते. जेव्हा गाडीमध्ये हे इंधन भरले जाते, तेव्हा इंधन टाकीच्या झाकणाजवळून (Filler Caps) काही प्रमाणात वायू (Vapours) किंवा इंधनाचे अंश बाहेर पडतात. हा गंध मुंग्यांना अन्नाचा भास करून देतो, ज्यामुळे त्या सिक्कीममधील व्हिडिओत दिसल्याप्रमाणे इंधन टाकीच्या आजूबाजूला गोळा होतात.
एकंदरीत फॅक्ट चेकमधून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल व्हिडिओमधील घटना खरी आहे आणि मुंग्या ई२० पेट्रोलमधील इथेनॉलच्या गंधामुळेच तिथे आकर्षित झाल्या होत्या. मात्र, पेट्रोलमध्ये उसाचा रस थेट मिसळलेला असतो किंवा ते चवीला गोड असते म्हणून मुंग्या तिथे येतात, हा सोशल मीडियावरील समज चुकीचा आहे. मुंग्या केवळ इथेनॉलच्या रासायनिक गंधाला अन्नाचा संकेत मानून तिथे जमा होतात.