Fact Check: कोरोना विषाणू विरोधी लस म्हणून तरुणांना दिले जाणार Anti-Fertility डोसेस? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य
लसीकरण सुरु झाल्यानंतर तर लसींच्याबाबत (Covid-19 Vaccine) अनेक दावे केले गेले, जे शेवटी खोटे असल्याचे निष्पन्न झाले
जेव्हापासून देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) शिरकाव केला आहे तेव्हापासून सोशल मिडीयावर अनेक खोट्या बातम्या व्हायरल होत आहे. लसीकरण सुरु झाल्यानंतर तर लसींच्याबाबत (Covid-19 Vaccine) अनेक दावे केले गेले, जे शेवटी खोटे असल्याचे निष्पन्न झाले. आताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व याद्वारे काही लोक लसीबद्दल संभ्रम पसरवत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बातमीमध्ये असा दावा केला जात आहे की, तरुणांना कोरोना लस सांगून प्रजनन विरोधी लसीचे डोस (Antifertility Vaccine) दिले जाणार आहेत.
अशाप्रकारे लसीबाबत गोंधळ पसरवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बातमीमध्ये डॉ. विश्वरूप यांच्या नावाचा हवाला देत असे लिहिले आहे की, प्रजनन विरोधी लस तरुणांना कोरोना लस म्हणून दिली जाईल, ज्यामुळे मुले होत नाहीत. तसेच या बातमीमध्ये लसीबाबत म्हटले आहे की, लस उत्पादक सरकारसोबत मुद्दाम संक्रमणाचे खोटे आकडे सांगत आहेत. त्याद्वारे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून जनतेला लस घेण्यास भाग पाडले जात आहे.
आता पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल बातमीची सत्यता पडताळली आहे व हा दावा फेटाळण्यात आला आहे. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'एका वृत्त लेखात असा दावा केला जात आहे की, तरुणांना कोरोना लस असल्याचे सांगून प्रजनन विरोधी लस दिली जाईल. हा दावा खोटा आहे.’ या ठिकाणी पीआयबीने कोविड विरोधी लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
यासह, सर्व लोकांना लसीशी संबंधित अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि लसीकरण करण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी एका मेसेजमध्ये सांगितले होते की, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे, त्याने कोणत्याही प्रकारची भूल (Anesthesia) घेऊ नये. अगदी स्थानिक भूल किंवा दंतचिकित्सक भूलही घेऊ नये. ही गोष्ट रुग्णासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र हा दावशी खोटा असल्याचे समोर आले होते.