CoWIN Hacked? 15 कोटी भारतीयांचा डेटा लीक झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; केंद्र सरकारने दिले 'हे' उत्तर

त्यात कोविड-19 लसीकरण (Covid-19 Vaccination) रजिस्ट्रेशनसाठी वापरला जाणारा कोविन अॅप (CoWIN App) हॅक झाला असून 15 कोटी भारतीय नागरिकांचा डेटा लीक झाल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने या मेसेजचा खुलासा केला आहे.

Centre debunks reports of the CoWIN hacked (Photo Credits: Twitter)

कोविड-19 संकट (Covid-19 Pandemic) काळात अनेक फेक न्यूज (Fake News) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याद्वारे नागरिकांची दिशाभूल होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण होते. सध्या सोशल मीडियावर अजून एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात कोविड-19 लसीकरण (Covid-19 Vaccination) रजिस्ट्रेशनसाठी वापरला जाणारा कोविन अॅप (CoWIN App) हॅक झाला असून 15 कोटी भारतीय नागरिकांचा डेटा लीक झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने (Centre Government) हा दावा फेटाळून लावत मेसेज फेक असल्याचे म्हटले आहे.

स्वायत्त सायबर संरक्षण व्यासपीठ Dark Tracer ने देखील डेटा लीक मेसेजचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. 15 कोटी लस घेतलेल्या भारतीय नागरिकांचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड, जीपीएस लोकेशन, राज्य इत्यादी माहिती लीक झाली आहे, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. (Fact Check: Covid-19 लस घेतल्यावर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होते? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य)

या व्हायरल मेसेजवर उत्तर देताना केंद्र सरकारने म्हटले की, "प्रथमदर्शी हा रिपोर्ट फेक आहे. पोर्टलवर सर्व डेटा अगदी सुरक्षितरित्या सेव्ह केला आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची Computer Emergency Response Team  याचा तपास करत आहे."

Tweets By Aarogya Setu:

Empowered Group on Vaccine Administration (CoWIN) चे चेअरमन डॉ. आर. एस. शर्मा म्हणाले की, "कोविन अॅप हॅक झाल्याच्या व्हायरल मेसेजने आमचे लक्ष वेधले असून या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो की, कोविनमध्ये लसीकरण डेटा अगदी सुरक्षितरित्या स्टोर करण्यात आला आहे. हा डेटा बाहेर शेअर करण्यात आलेला नाही. कोविन अॅप मधील युजर्सचे राहते ठिकाण लीक झाल्याचा या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे. परंतु, कोविन अॅपद्वारे युजर्सची अशी कोणतेही माहिती जतन केली जात नाही."

यापूर्वी फ्रेंच सुरक्षा संशोधक Baptiste Robert उर्फ Elliot Alders यांनी देखील ही पोस्ट रिट्विट केली होती. मात्र नंतर डिलीट केली. हॅकर ग्रुप "Dark Leak Market" यांच्या ट्विटनंतर हा फेक मेसेज व्हायरल होऊ लागला. या ट्विटमध्ये म्हटले होते की, "कोविन अॅपवर रजिस्ट्रर केलेल्या 15 कोटी भारतीयांचा डेटा आम्हाला मिळाला आहे आणि हा डेटा आम्ही 800 डॉलर्संना विकत आहोत."