Coronavirus in India: महाराष्ट्रातील लोणावळ्यात कोरोना व्हायरसग्रस्त रूग्ण नाहीत; सोशल मीडीयामध्ये इंग्रजी वृत्तवाहिनीच्या नावाने फिरत असलेली बातमी खोटी

महाराष्ट्रात लोणावळा मध्ये 4 जणांना कोरोना व्हायरसची लागण, देशात रूग्णांची संख्या 32 वर पोहचली " अशाप्रकारचे वृत्त पसरवले जात होते मात्र यावर वृत्त वाहिनीने खुलासा करत ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.

Fake news on coronavirus cases in Lonavala | (Photo Credits: Twitter)

Coronavirus Fake News:  सध्या जगभरात पसरलेली कोरोना व्हायरसची दहशत आता भारतामध्येही पोहचली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यात अद्याप कोरोनाचे रूग्ण नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दिली आहे. मात्र काही समाजकंटक कोरोना व्हायरसच्या दहशतीचा फायदा घेऊन त्याबाबतच्या अफवा पसरवत आहे. दरम्यान महाराष्ट्रात लोणावळा भागात 4 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त सोशल मीडीयामध्ये झपाट्याने फिरत आहे. मात्र ही माहिती खोटी आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीचा लोगो वापरून "महाराष्ट्रात लोणावळा मध्ये 4 जणांना कोरोना व्हायरसची लागण, देशात रूग्णांची संख्या 32 वर पोहचली " अशाप्रकारचे वृत्त पसरवले जात होते मात्र यावर वृत्त वाहिनीने खुलासा करत ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान काल (6 मार्च) संध्याकाळ पर्यंत झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पत्रकार परिषदांमध्ये अद्याप कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झालेली नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. सध्या मुंबई, नागपूर मध्ये लॅब सुरू करण्यात आली आहे. Mumbai: बीएमसी व महाराष्ट्र सरकारने 'कोरोना व्हायरस'संदर्भात जारी केले 24x7 हेल्पलाईन क्रमांक; आता मुंबईत 1916 नंबरवर मिळू शकणार मदत.

मुंबईमध्येही कस्तुरबा गांधी रूग्णालयामध्ये विशेष आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून खास 24 तास आपत्कालीन टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल येत्या होळीच्या सणावर कोरोना व्हायरसचं सावट असल्याने हा सण सांभाळून साजरा करण्याचं आवहन केलं आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर Coronavirus Hoax Message: कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी 5 मार्च पासून भरपगारी सुट्टी; जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेज मागील सत्य! हा मेसेज देखील फिरत होता.

टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीचं ट्वीट

दरम्यान भारतामध्ये गुरूवार (5 मार्च) च्या मध्यरात्रीपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 30 असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारताच्या संसदेमध्ये लोकसभेत देखील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून गर्दीची ठिकणं टाळण्याचा, हात वारंवार स्वच्छ धुणं हे प्रतिबंधात्मक उपाय सुचवण्यात आले आहेत.