‘धर्मवीर’ सिनेमात ‘वसंत डावखरे’ साकारणारे अभिनेते योगेश शिरसाट यांचा शिवसेनेत प्रवेश
योगेश शिरसाट याच्यासोबत अभिनेते राजेश भोसले, केतन क्षीरसागर, शेखर फडके आणि अलका परब यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांची भूमिका साकारणारे अभिनेते योगेश सिरसाट यांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. योगेश शिरसाट याच्यासोबत अभिनेते राजेश भोसले, केतन क्षीरसागर, शेखर फडके आणि अलका परब यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाद्वारे योगेश शिरसाट हे लोकप्रिय झाले आहेत.
सिनेसृष्टीतील समस्या सोडवण्यासाठी काम करणार असल्याचं योगेश याने यावेळी सांगितलं. “आमच्या क्षेत्रातही कष्टकरी आहेत, बरेच कलाकारांना मदतीची गरज आहे. त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. आमच्या माध्यमातून तो आवाज पोहोचावा यासाठी आम्ही शिंदे साहेबांना भेटलो आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.”
कलाकारांच्या शिवसेना प्रवेशावेळी अभिनेते सुशांत शेलार म्हणाले की, “सिनेसृष्टीतील कलाकार, लेखक, दिग्दर्शक, मेकअप करणारे कलाकार. डान्सर्स तसेच या चित्रपट क्षेत्रातल्या सर्व घटकांना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता या सर्व कलाकारांना एकत्र करून कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं जाईल.”