Maharashtra Rain Forecast: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह 'या' जिल्ह्यात Yellow Alert जारी; 26 आणि 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
राज्यातील अनेक जिल्ह्यात या दिवशी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
Maharashtra Rain Forecast: सध्या देशभरामध्ये वातावरणात बदल होताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे थंडीची लाट आली असून काही ठिकाणी मात्र, पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने सोमवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या दिवशी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह इतर जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
धुळे, नंदुरबार, जळगावसह 'या' जिल्ह्यात पाऊस -
हवामान खात्याने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिकमधील घाट परिसर आणि छत्रपती संभाजी नगर येथे 26 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर 27 डिसेंबरला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पुण्याचा घाट, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशीम येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (हेही वाचा -Delhi Weather: दिल्लीत थंडीची लाट, किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने दिल्लीकरांना भरली हुडहुडी)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र -
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीची तीव्रता कमी झाली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागात पाऊसही पडला असून, आजपासून पुढील चार दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तथापी, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली असून पुण्यात 17 ते 20 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये 16.4, कोल्हापूर 17.7 आणि अहमदनगरमध्ये 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड आणि लातूरमध्ये 20 अंश सेल्सिअस, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 18.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा -Weather Forecast Tomarrow, December 23: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता येथे कसे असेल उद्याचे हवामान)
पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज -
सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तसेच हवामान खात्याने पूर्व आणि पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 24 तासांत, किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात थंडीची तीव्रता आणखी कमी होईल.