Yavatmal Double Murder: यवतमाळमध्ये दोन युवकांची निर्घृण हत्या, दुहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ

Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

यवतमाळ (Yavatmal) शहराजवळच्या कोळंबी जंगलात दोन युवकांची निर्घुणपणे हत्या (Double Murder) करण्यात आली आहे. यवतमाळ शहरातील रहिवासी असलेल्या दोन्ही युवकांचा सोमवारी रात्रीच्या सुमारास खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. या हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे. उज्ज्वल छापेकर (30) आणि अविनाश कटरे (32) अशी मृतांची नावे असून ते दोघेही यवतमाळ शहराचेच रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

उज्जवल आणि अविनाश हे दोघे मित्र शहरात परत जाताना कोळंबी फाटा या जंगलाच्या जवळून दुचाकीवरुन जात असताना प्रथम त्यांना दुचाकीवरुन पाडण्यात आले. यानंतर त्यांना प्रथम मारहाण करुन बेशुद्ध करण्यात आले. यानंतर या दोघांवरही चाकूने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली, अविनाशच्या डोक्यावर दगडाने प्रहार करण्यात आले. हे हत्याकांड रात्री 10 च्या नंतर घडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

यवतमाळ ग्रामीण, वडगाव जंगल ठाण्याचे पोलीस घटनेची माहिती होताच घटनास्थळी पोहोचले. मात्र मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. मारेकऱ्यांनी मृतदेह छिन्नविछिन्न केले आहेत. घटनास्थळावर खायचे समोसे आदी वस्तू आढळल्या. मारेकरी चार ते पाच संख्येने असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.