पुणे: यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पूर्णपणे 'कोविड रुग्णालय' म्हणून समर्पित
त्यानंतर आता हे रुग्णालय पुर्णपणे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना रुग्णांची वाढती संख्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पुण्यातील (Pune) यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (YCMH) पूर्णपणे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार होण्यासाठी आणि वाढते रुग्ण पाहता त्यांना बेड उपलब्ध होण्यासाठी रुग्णालय प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड मनपाने हा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी एप्रिल-मे महिन्यात हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी देण्यात आले होते. त्यानंतर आता हे रुग्णालय पुर्णपणे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
YCMH रुग्णालयातील OPD आणि IPD अन्य रुग्णांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. केवळ आपत्कालीन स्थितीत ते उपलब्ध करण्यात येतील. याशिवाय प्रसूती आणि बालरोग विभाग कार्यरत राहतील.हेदेखील वाचा- राज्यात कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एक मार्ग असून डोसचा तुटवडा भासणे हे आमच्या प्रयत्नांना अर्धांगवायू करण्यासारखे आहे- धनंजय मुंडे
नॉन-कोविड रुग्णांमुळे डॉक्टर्स आणि नर्सेसना कोविड रुग्णांवर नीट लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कामाचाही जास्त ताण येतो. कोविड आणि नॉन कोविड रुग्णांना हाताळणे हे डॉक्टर आणि पेशंटच्या जीवाला घातक आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे हॉस्पिटलच्या अधिका-यांनी सांगितले.
Indian Express ने दिलेल्या वृत्तानुसार, यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 430 बेड्स आणि त्यात 55 ICU बेड्स आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 3,05,372 वर पोहोचली आहे. सध्या शहरात 46,071 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान पुणे शहरात जर कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर येत्या काळात रुग्णालयात बेड्स कमी पडण्याची शक्यता आहे, अशी भीती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. तसेच, कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेले व्हेंटीलेटर्स आणि बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना विनंतीपत्र दिले आहे, असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.