वरळी: मुंबई पोलिसांच्या गाडीत महिलेची प्रसुती; पोलिसांच्या प्रसंगावधामुळे वाचले आई आणि बाळाचे प्राण

मुंबईतील वरळी येथे ही घटना घडली. गरोदर महिलेला रुग्णालयात नेत असताना गाडीतच तिला प्रसुती वेदना सुरु झाल्या आणि गाडीतच तिची प्रसुती झाली.

Mumbai Police (Photo Credits: ANI)

एका गरोदर महिलेने मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गाडीतच बाळाला जन्म दिला. मुंबईतील (Mumbai) वरळी (Worli) येथे ही घटना घडली. गरोदर महिलेला रुग्णालयात नेत असताना गाडीतच तिला प्रसुती वेदना सुरु झाल्या आणि गाडीतच तिची प्रसुती झाली. मात्र यावेळी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे महिला आणि बाळ सुखरुप आहेत. (पुण्याहून यवतमाळ येथे पायी निघालेल्या एका गर्भवती महिलेची अहमदनगरमधील एटीएममध्ये प्रसुती)

वरळी नाका येथे काल (13 एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास एक गरोदर महिला रस्त्यात चक्कर येऊन पडली. त्यावेळी आजूबाजूला उपस्थित लोकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महिला गरोदर असून तिला प्रसुती वेदना सुरु झाल्या होत्या आणि तिच्यासोबत नातेवाईक किंवा इतर कोणीच  नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अॅम्ब्युलन्सला बोलवण्यात वेळ न दवडता पोलिसांच्या गाडीत घातलं आणि नायर रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. मात्र महिलेच्या प्रसुती वेदना वाढत होत्या. त्यामुळे गाडीत उपस्थित महिला पोलिसांच्या मदतीने गाडीतच तिची प्रसुती करण्यात आली. (ठाणे: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेची रेल्वेस्थानकातील वन रुपी क्लिनिकमध्ये सुखरुप प्रसुती)

ANI Tweet:

संबंधित महिला सात महिन्यांची गरोदर होती. मात्र वेळेपूर्वीच प्रसुती झाल्याने बाळाला दक्षता विभागात ठेवण्यात आलं असून आई सुखरुप आहे. या प्रसंगात सहभागी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचं वरिष्ठांकडून शाबासकी मिळाली आहे. ही वार्ता प्रसारमाध्यमांत येताच पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अनेक प्रसंगांमध्ये कर्तव्यापलिकडे जावून काम करण्याची मुंबई पोलिसांची वृत्ती या घटनेतही अधोरेखित झाली आहे.