Pune Fraud: बनावट धनादेश वापरून पुण्यातील महाविद्यालयाच्या खात्यातून 25 लाख काढले, अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल
या प्रकरणी पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (BJMC) अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
एका व्यक्तीने बनावट चेक (Fake check) सादर करून पुण्यातील (Pune) महाविद्यालयाच्या (College) खात्यातून 25 लाख रुपये काढून घेतले आहे. या प्रकरणी पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (BJMC) अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कथित फसवणूक करणाऱ्याच्या बँक खात्यात (Bank Account) हस्तांतरित केलेली रक्कम परत मिळवण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींनी 6 ऑक्टोबर 2021 रोजी बँक ऑफ बडोदाच्या बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शाखेत बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांसह 25 लाख रुपयांचा धनादेश सादर केला.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या बँक खात्यातून ही रक्कम काढून फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली. कॉलेजच्या खात्यातून पैसे काढण्याचा आणखी एक प्रयत्न 11 ऑक्टोबर रोजी झाला होता. हेही वाचा Mumbai: मेकअप आर्टिस्टला दारुची बॉटल ऑनलाईन खरेदी करणे पडले महागात, गमावले 70 हजार रुपये
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 465, 467, 468, 471, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड म्हणाले, मेडिकल कॉलेजच्या बँक खात्यातून काढलेले पैसे परत मिळाले आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू आहे.