Pune Covid-19 Restrictions: पुण्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार? दिलीप वळसे पाटील यांचे संकेत

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के एवढा आहे. एकीकडे राज्यातील रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याच्या मागणींनी जोर धरला आहे.

Dilip Walse Patil (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के एवढा आहे. एकीकडे राज्यातील रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याच्या मागणींनी जोर धरला आहे. याचपार्श्वभूमीवर पुणेकराना (Pune) मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील करोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात नुकतीच चर्चा झाली आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले आहेत.

दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पुण्यातील कोरोना निर्बंधांवर भाष्य केले आहे. पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र तसेच पुणे जिल्ह्याला दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता पुण्यासह राज्यातील 11 जिल्ह्यांत ‘लेव्हल 3 ’चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Covid-19 Update: राज्यात आज 6,959 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ; 225 रुग्णांचा मृत्यू

पुण्यात शुक्रवारी (30 जुलै 2021) 236 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 243 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 4 लाख 86 हजार 905 वर पोहचली आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 8 हजार 761 जणांनी प्राण गमावले आहे. पुण्यात सध्या 2 हजार 577 जणांवर उपचार सुरू आहेत.