Mumbai Local: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार? मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत
मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने सरकारने आणि मुंबई महापालिकेने तूर्तास सर्वसामान्यांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास बंदी कायम ठेवली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने मुंबईतील लोकल रेल्वे (Mumbai Local) सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या मागणींनी जोर धरला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने सरकारने आणि मुंबई महापालिकेने तूर्तास सर्वसामान्यांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास बंदी कायम ठेवली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी लोकल प्रवासाबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ज्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असावी असे त्यांनी म्हटले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत पूरग्रस्तासांठी मदतीची घोषणा होऊ शकते. तसेच लोकल प्रवासाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकी आधी अस्लम शेख हे टीव्ही9 मराठीशी बोलताना म्हणाले की, ज्यांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना लोकल, एसटी किंवा दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली पाहिजे. दोन्ही डोस घेणाऱ्या मॉल, दुकाने आणि कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना अधिक मुभा कशी देता येईल? यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे, असे अस्लम शेख म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Maharashtra Floods: महाराष्ट्रात पुरामुळे तब्बल 4000 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज, 209 जणांचा मृत्यू; NCP करणार 16,000 कुटुंबांना मदत
दरम्यान, सर्वसामन्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येत नसल्याने भाजप आक्रमक झाली आहे. यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. तसेच मुबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकवण्यासाठी सामान्य मुंबईकर 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत प्रवास करतील, अशा इशाराच भाजपकडून देण्यात आला आहे.
मुंबई मंगळवारी (27 जुलै) 343 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 466 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईत सध्या 5 हजार 267 रुग्ण सक्रीय आहेत.