Maharashtra Weather Alert: हुडहुडी भरवणारा गारठा आणि पावसाची रिपरिप दोन्ही कायम; जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामान अंदाज
नको त्या वेळी पाऊस धोधो कोसळतो आहे. यंदा तर हिवाळ्याचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातही पाऊस बेफाम पडतो आहे. अर्थात, इतिहासातही या महिन्यांमध्ये पाऊस पडल्याची नोंद असली तरी त्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प होते. यंदा मात्र विक्रमी पाऊस पडत असल्याने गांभीर्य वाढले आहे.
महाराष्ट्रात ऋतुमान (Maharashtra Weather) बदलत चालले आहे. नको त्या वेळी पाऊस धोधो कोसळतो आहे. यंदा तर हिवाळ्याचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातही पाऊस बेफाम पडतो आहे. अर्थात, इतिहासातही या महिन्यांमध्ये पाऊस पडल्याची नोंद असली तरी त्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प होते. यंदा मात्र विक्रमी पाऊस पडत असल्याने गांभीर्य वाढले आहे. राज्यात एका बाजूला थंडी आणि दुसऱ्या बाजूला पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे वातावरण काहीसे विचित्र तयार झाले आहे. पुढील काही काळ हे चित्र असेच राहण्याची शक्यता (Maharashtra Weather Alert) हवामान विभागाने वर्तवली आहे.
अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठाच फटका बसला आहे. आता किमान रब्बी हंगामात तरी निसर्ग साथ देईल, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, त्या आशेवरही पावसाचे पाणी फिरले. अवकाळीने शेतकऱ्यांच्या द्राक्ष, टोमॅटो, कांदा या व्यापारी पिकांचे नुकसान केलेच. शिवाय हरबरा, मका आदी पिकांनाही फटका बसला. याशिवाय बाजारपेठेत विक्रियोग्य झालेला भाजीपालाही शेतात पडून आहे. फुलशेतीचेही मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळते आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain and Weather Update: महाराष्ट्रात पावासाची रिपरिप, अनेक ठिकाणी कांदा, टोमॅटो शेतीला फटका, भाज्याही महागल्या)
पावसाने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, अचानक पडलेल्या पावासामुळे नद्यांना पुर आले आहेत. नद्या-नाले ओसंडून वाहात आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात की आम्ही आमच्या आयुष्यात अनेक पाऊस पाहिले. परंतू, अशा प्रकारचा आणि या हंगामातला पाऊस कधीच पाहिला नाही. हवामान विभाकडेही अशा प्रकारच्या या हंगामातील पावसाची विशेष नोंद इतिहासात पाहायला मिळत नाही. असलीच तर ती अगदीच किरकोळ प्रमाणात आहे.