'कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत'- CM Uddhav Thackeray

बेळगावसह कारवार, निप्पानी भागात मराठी लोक बहुसंख्य आहेत आणि पूर्वी हा भाग बॉम्बे प्रेसीडेंसीचा हिस्साही होता. सध्या बेळगाव हा कर्नाटकचा एक भाग आहे. मात्र बर्‍याच संस्था हा भाग महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी धडपडत आहेत

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) सीमेबाबत वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मोठे विधान केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले की, आपले राज्य कर्नाटकव्याप्त मराठी भाषिकांचा भाग महाराष्ट्रात आणण्यास वचनबद्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक–महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव व काही सीमावर्ती भागांना महाराष्ट्रात आणण्यासाठी संघर्ष करणार्‍या प्रादेशिक संघटनेने, 1956 मध्ये याच उद्देशाने लढा देताना मृत्यू झालेल्या लोकांसाठी 17 जानेवारी रोजी 'शहीदी दिवस' साजरा केला.

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन! सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग तसेच समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा!’

ते पुढे म्हणाले, ‘कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन.’

दुसरीकडे, ‘संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या सीमा लढ्यातील सर्व शूरवीरांना आजच्या 'हुतात्मा दिना'निमित्त विनम्र अभिवादन! कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी निर्धारानं लढत राहणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (हेही वाचा: Coronavirus: राज्यातील सर्वसामान्यांना कोरोनाची लस मोफत देण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी)

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात बेळगाववरून बराच काळ वाद सुरू आहे. बेळगावसह कारवार, निप्पानी भागात मराठी लोक बहुसंख्य आहेत आणि पूर्वी हा भाग बॉम्बे प्रेसीडेंसीचा हिस्साही होता. सध्या बेळगाव हा कर्नाटकचा एक भाग आहे. मात्र बर्‍याच संस्था हा भाग महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी धडपडत आहेत.