Water Shortage: महाराष्ट्रात एकीकडे मुसळधार पाऊस, तर बुलढाणा जिल्ह्यातील 'या' गावात गेले 17 दिवस नळाला पाणी नाही

या गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने थेट पुढाकार घेऊन त्यांच्या गावाची पाण्याच्या समस्येतून सुटका करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Representative Image (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जनतेला अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा (Water Shortage) सामना करावा लागत आहे. घडाभर पाण्यासाठी लोक अनेक मैल चालत जात आहेत, खड्डे खोदत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात तर ही समस्या 60 वर्षांपासून भेडसावत आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे जिथे 17 दिवसांपासून घरांच्या नळाला पाणी आले नाही. लोकांना गावाबाहेर जाऊन विहिरीचे पाणी आणावे लागत आहे.

महत्वाचे म्हणजे, पाण्याआभावी शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येत नाहीत. शेतमजूर कामावर जाऊ शकत नाहीत. हे गाव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात आहे. गावाचे नाव चोरपांग्रा. एकीकडे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असताना, या गावातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी याबाबतचा रोष ग्रामपंचायत प्रशासनावर काढला आहे. टीव्ही9 हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे.

ग्रामपंचायतीने तातडीने पाण्याची व्यवस्था न केल्यास ग्रामपंचायतीविरोधात हंडी मोर्चा काढणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी विशेषतः महिलांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. यासाठी महिला ग्रामस्थ अधिकाऱ्यांना जबाबदार धरत आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावासाठी यापूर्वी प्रशासनाने सुमारे 23 लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना आणली होती.

त्याअंतर्गत विहिरी, पाइपलाइन, नळ, पाण्याच्या टाक्या यासह सर्व सुविधा सुरू करायच्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीने एवढी निकृष्ट व्यवस्था केली आहे की, विहिरीत पाणी असतानाही पंधरा-वीस दिवसांपासून ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. गावकऱ्यांना गावाबाहेर जाऊन विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. (हेही वाचा: पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; रस्ते जलमय, घरात शिरले पाणी, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन)

गावासाठी शासनाचा निधी येतो मात्र ग्रामपंचायतीमधील अधिकारी आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे गावाचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने थेट पुढाकार घेऊन त्यांच्या गावाची पाण्याच्या समस्येतून सुटका करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.