काय सांगता? लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग बदलून झाले लाल; नमुना गोळा करून कारण शोधण्याच्या प्रयत्नात वनविभाग (See Photo)
हे एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. तर नेहमीच भूगर्भशास्त्रज्ञ व शास्त्रज्ञ या सरोवराच्या स्वरूपामुळे आश्चर्यचकित झाले आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) लोणार सरोवर (Lonar Crater Lake) हे एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, ज्याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. हे एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. तर नेहमीच भूगर्भशास्त्रज्ञ व शास्त्रज्ञ या सरोवराच्या स्वरूपामुळे आश्चर्यचकित झाले आहे. आता तर अजूनच अचंबित करणारी बाब समोर येत आहे. मागील 2-3 दिवसांपासून या तलावाचे पाणी लाल रंगात बदलत आहे. जिल्हा प्रशासनानेही ही बाब गंभीर असल्याचे समजून तपास सुरू केला आहे. मात्र, या तलावावरील पूर्वीच्या संशोधनात असे आढळले आहे की वेळोवेळी याच्या पाण्यात बदल होत आहेत.
याबाबत तहसीलदार सैफन नदाफ (Saifan Nadaf) म्हणाले, 'गेल्या 2-3 दिवसांपासून या तलावाच्या पाण्यात बदल होत असल्याचे आमच्या लक्षात येत आहे. या सरोवराचे पाणी लाल होत आहे. आम्ही वनविभागाला नमुना घेऊन चौकशी करण्यास सांगितले आहे.' या तलावात असलेले खारट पाणी हे या गोष्टीचे प्रतीक आहे की, एकेकाळी येथे समुद्र होता. मात्र सध्या या तलावाचे पाणी का आणि कसे लाल झाले याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. याबरोबरच, लोणार येथे घडलेली टक्कर ही उल्का आणि पृथ्वी यांच्यात झाली होती की, पृथ्वीवर दुसर्या ग्रहाची टक्कर झाली होती, यावरही शास्त्रज्ञ अद्याप संशोधन करत आहेत.
लोणार सरोवराचे रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन करीत असलेले वैज्ञानिक आनंद मिश्रा यांच्या मते, लॉक डाऊनमुळे हवामान बदलले आहे, पाऊस न पडल्यामुळे सरोवराचे पाणी कमी झाले आहे अशा अनेक कारणांमुळे पाण्याचा रंग बदलला असावा. लोणारवर काम करणारे प्राध्यापक डॉ. सुरेश मापारी यांनी याबाबत काही जल तज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांच्या मते, मीठाच्या पाण्यात हेलोबॅक्टेरिया आणि ड्यूनोनीला बुरशीच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे, कॅरोटोनॉइड्स नावाचे रंगद्रव्य वाढते, ज्यामुळे पाणी लाल होऊ शकते. मात्र हे सर्व आताच का घडले याचा शोध चालू आहे. (हेही वाचा: Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळणार 15 हजारापासून दीड लाख लाखापर्यंत मदत; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय)
दरम्यान, लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. या सरोवराची निर्मिती 52,000± 6000 वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण 2010 साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय, 5,70000 ± 47,000 वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे.