Waghela Tea Depot Raid: महाराष्ट्रातील प्रतिष्ठित 'वाघेला चहा' डेपोवर FDA चा छापा; लाखो रुपयांची भेसळयुक्त पावडर जप्त

अग्रवाल यांनी दावा केला की, वाघेला चहा डेपोचे मालक त्यांच्या चहा पावडरमध्ये अंदाजे 1600 भाग प्रति दशलक्ष (ppm) रंग समाविष्ट करत होते, जे एफडीए आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) या दोघांनी निर्धारित केलेल्या 100 ppm मर्यादा ओलांडत होते.

Waghela Tea (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चहा पावडर कंपनी असलेल्या ‘वाघेला चहा’च्या (Waghela Tea) अडचणी वाढल्या आहेत. औषध प्रशासनाने (FDA) मंगळवारी आयकॉनिक वाघेला चहा डेपोवर छापा टाकला. ठाण्यातील मदत सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते शशी अग्रवाल यांनी भेसळीचा आरोप केल्यानंतर हा छापा टाकण्यात आला.  छाप्यादरम्यान 8,69,000 रुपयांची भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. एफडीएच्या पथकाने स्थानिक पोलिसांसह या चहा डेपोवर छापा टाकला. दुपारी 1 च्या सुमारास सुरु झालेली ही कारवाई रात्री 9 वाजेपर्यंत चालू होती.

मंगळवारी अन्न व औषध प्रशासन (FDA), ठाणे सहाय्यक आयुक्त (अन्न) व्यंकटेश वेदपाठक म्हणाले, ‘आम्ही स्थानिक पोलीस कर्मचार्‍यांसह ठाण्यातील वाघेला चहा डेपोवर दुपारी 1 वाजता छापा टाकला. सामाजिक कार्यकर्ते शशी अग्रवाल आणि आणखी एका एजन्सीकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली.’

अग्रवाल यांनी दावा केला की, वाघेला चहा डेपोचे मालक त्यांच्या चहा पावडरमध्ये अंदाजे 1600 भाग प्रति दशलक्ष (ppm) रंग समाविष्ट करत होते, जे एफडीए आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) या दोघांनी निर्धारित केलेल्या 100 ppm मर्यादा ओलांडत होते. अग्रवाल यांनी सांगितले की, हा चहा प्यायल्यानंतर ते आजारी पडले होते. ठाण्यातील वकील पूजा उतेकर यांनी सांगितले की, त्यांनी ठाणे एफडीएकडे 5 जानेवारी 2023 रोजी वाघेला चहा पावडरमधील भेसळीबाबत तक्रार केली होती.

दरम्यान, एफडीएने यापूर्वीही 8 डिसेंबर 2018 रोजी वाघेला चहा डेपोवर त्यांच्या चहाच्या उत्पादनांमध्ये भेसळ झाल्याच्या संशयावरून छापा टाकला होता. त्यावेळी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 637.500 किलो चहा पावडर जप्त केली होती. त्यावेळी बंद आणि खुल्या चहा पावडरचे नमुने घेतले होते. त्यानंतर 10 डिसेंबरला वाघेला यांच्या गोदामावर छापा टाकून पुन्हा 326 किलोचा साठा जप्त केला. कंपनीच्या पॅकिंग ब्रॅण्डवरही नागरिकांची दिशाभूल केली गेल्याचे निदर्शनास आले होते. देशभरातील उच्च-गुणवत्तेचा चहा ऑफर करण्यासाठी ओळखले जाणारे हे दुकान ‘वाघेला इन्स्टंट मिक्स पावडर’ या नावाने प्रसिद्ध आहे.