सांगली: विटा-वाळूज एसटी पलटली; अपघातामध्ये 36 विद्यार्थी जखमी

या बसमध्ये सुमारे 50-55 विद्यार्थी प्रवास करत होते. त्यापैकी 38 जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Image used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

सांगलीमध्ये (Sangli) आज (18 सप्टेंबर) विटा (Vita)  येथील देवनगर-वाळूज (Devnagar -  Waluj)  रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. एका गाडीला चुकवण्याच्या नादामध्ये एसटी बस (MSRTC Bus) पलटी झाल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये 38 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर नजिकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या बसमध्ये सुमारे 50-55 विद्यार्थी होते. टमटमला चुकवण्यासाठी बस एका बाजूला घेताना हा अपघात झाल्याचं मीडिया रिपोर्टमधून समोर आलं आहे.

विटा येथून भांबर्डे, देवनगर, संगोला मार्गावरून विटा आगाराची बस वाळूजकडे निघाली होती. सांगलीतील ग्रामीण भागातील विद्यार्थी वाळूजला शाळेत जाण्यासाठी या एसटी बसमधून प्रवास करत होते. बस देवनगरहून पुढे आली. तेथे सांगोलाला जाताना टमटमला चुकवताना चालकाने बस बाजुला घेतली मात्र नेमकी त्यावेळेस बस पलटी झाली आणि हा अपघात झाला. जखमींना नजीकच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.

काही विद्यार्थ्यांच्या हाता- पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तर किरकोळ जखमा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. या अपघातामध्ये बसचा चालक आणि वाहक देखील जखमी झाला आहे.