Virginity Test: अंबरनाथ ग्रामपंचायत सरपंच संगम गारुंगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल, कौमार्य चाचणीस विरोध केल्याने कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचे प्रकरण
कौमार्य चाचणी (Virginity Test) करण्यास विरोध केल्याने कुटुंबाला समाजातून वाळीत (Social Exclusion) टाकणे व संबंधित तरुणाच्या आजीच्या अंत्ययात्रेत सहभागी न होणे या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात अंबरनाथ ग्रामपंचायत (Ambernath Gram Panchayat) सरपंच संगम गारुंगे (Sangam Garunge) आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार आल्यास कारवाई केली जाण्याचा इशारा पोलिसांनी बुधवारीच दिला होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, कोणत्याही कारणास्थव समाजातून एखाद्या कुटुंबावर बहिष्कार टाकणे किंवा त्याला वाळीत टाकणे हे कायद्याने गुन्हा आहे.
अंबरनाथ (Ambernath) येथील कांजरभाट (Kanjarbhat Community) समाजाने आपल्याच समाजातील एका कुटुंबावर बहिष्कार टाकत वृद्धेच्या अंत्ययात्रेस जाण्यास नकार दिला होता. ही वृद्धा विवेक तमाचीकर (Vivek Tamachichar) या तरुणाची आजी होती. विवेक तमाचीकर यांनी विवाह केल्यावर कौमार्य चाचणी (Virginity Test) करण्यास विरोध केला होता. त्यामुळे चिडलेल्या कांजरभाट समाज आणि समाजातील जातपंचायतीने तमाचिकर कुटुंबावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. यातूनच विवेक तमाचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासही समाजाने नकार दिल्याचे समजते. (हेही वाचा, Virginity Test: पुढारलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नववधूंची ‘कौमार्य’चाचणी; शहरातील उच्चभ्रू परिसरातील घटना))
प्राप्त माहितीनुसार, विवेक तमाचीकर यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. विवेक यांचा विवाह झाल्यानंतर तमाचिकर यांना परंपरेने कौमार्य चाचणीला सामोरे जाण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी त्यास विरोध केला. यावर समाजातील काही मंडळींनी त्यांच्यावर कौमार्य चाचणीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही भीक न घालता विवेक तमाचीकर यांनी दबाव झुगारुन देत आपण कौमार्य चाचणी करणार नाही असे ठासून सांगितले. त्यानंतर समाजाकडून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यातूनच आता अंत्ययात्रेतही सहभागी होण्यावर समाजाने बहिष्कार टाकल्याचे समजते.