Coronavirus: लॉकडाऊनमुळे बाजारात भाजीपाल आणि अन्नधान्याचा तुटवडा; डाळींचे भाव शंभरी पार

देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे.

डाळ भाववाढ ( फोटो सौजन्य - फाइल इमेज )

चीनच्या वुहान शहरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण भारताला विळखा घातला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे.

राज्यात भाजीपाला तसेच डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने धान्य तसेच भाजीपाला घेऊन येणाऱ्या ट्रकला अडथळा येत आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, डाळी यांचा तुटवडा जाणवत आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी मुख्यमंत्री निधीस देणगी द्या - उद्धव ठाकरे; 28 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

मागील आठवड्यात किरकोळ मार्केटमध्ये 28 ते 30 रूपये दराने विकला जाणारा गहू सध्या 35 ते 40 रूपये दराने विकला जात आहे. तसेच ज्वारीचे दर 45 ते 50 वरून 50 ते 60 रूपये किलो इतके झाले आहेत. याशिवाय तुरडाळ 80 ते 100 रूपयांवरून 100 ते 130 रूपये किलो झाली आहे. तसेच मुगडाळ 80 ते 100 रूपयांवरून 100 ते 130 रूपये किलो झाली आहे. त्यामुळे नागरिकांना भाववाढीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन काळात नागरिकदेखील दुकानदार देईल त्या भावाने धान्यांची तसेच डाळींची खरेदी करत आहे.

दरम्यान, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व किराणा दुकाने, भाजीपाला, फळ, आदी दुकाने दिवसभर सुरू राहतील असं सांगितलं होतं. लॉकडाऊनच्या भीतीने नागरिक किराना दुकानात गर्दी करत आहेत. तसेच काही ठिकाणी दुकानदार ग्राहकांना चढ्या भावात वस्तू विकत आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असणाऱ्या नागरिकांना जास्त पैसे देऊन वस्तूंची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.