वर्धा: माजी खासदार विजय अण्णाजी मुडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन

विजय मुडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील जलगाव मध्ये 16 डिसेंबर 1943 रोजी झाला होता.

विजय अण्णाजी मुडे (Photo Credits-Twitter)

भाजप पक्षाचे माजी खासदार आणि आमदार विजय अण्णाजी मुडे यांचे शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आर्वी येथे निधन झाले आहे. विजय मुडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील जलगाव मध्ये 16 डिसेंबर 1943 रोजी झाला होता. मुडे यांनी 1967 ते 1990 पर्यंत त्यांनी शिक्षक रुपात कार्यरत होते. तर सन 1990 मध्ये मुडे यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्यात आले. याच दरम्यान 11 व्या लोकसभेत मुडे यांनी काँग्रेसचे नेते वसंतराव साठे यांना पराभूत केले होते. 15 मे 1996 ते 4 डिसेंबर 1997 पर्यंत मुडे यांनी खासदारकीचे कार्य सांभाळले. जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती.

एक शिक्षक व अत्यंत साधा हाडाचा कार्यकर्ता म्हणून विजय अण्णाजी मुडे यांनी आपली ओळख निर्माण केली होती. सन 1990 ते 1996 मध्ये विधान परिषदेत सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे. भाजप पक्षाची पायेमुळे वर्धा जिल्ह्यात रोवण्यात मुडे यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. तर विधान परिषदेच्या सभागृहात तत्कालीन नेते व मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या सोबत त्यांनी सतत सहा वर्षे उल्लेखनीय काम केलेले होते.(कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास 50 लाख रुपयांची मदत; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती)

दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुडे यांनी काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर मुडे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. काही दिवसांपासून मुडे आर्वी मधील साईनगर येथे राहत होते. शनिवारच्या संध्याकाळी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने डॉ. अरुण पावडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी मुडे यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले.