Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर हिंसाचार पीडित मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांस 45 लाख रुपयांची मदत

या चर्चेनंतर हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपये देण्यात येतील. तसेच, या हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी केली जाईल असे जाहीर करण्यात आले.

Lakhimpur Kheri Violence (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri Violence) येथे भडकलेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आणि प्रशसनात चर्चा झाली. या चर्चेनंतर हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपये देण्यात येतील. तसेच, या हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी केली जाईल असे जाहीर करण्यात आले. हिंसाचारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 10-10 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येईल. सरकारने ठोस अश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रविवारपासून सुरु असलेले आपले आंदोलन मागे घेतले.लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.

लखीमपूर खीरी येथील हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते लखीमपूर येथे दाखल होत होते. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखले किंवा ताब्यात घेऊन अटक केली. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, लखीमपूर येथे हिंसाचार तेव्हा भडकला जेव्हा शेतकऱ्यांच्या एका गटाने केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना अडविण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकारी शेतकरी हे केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या भाषणामुळे नाराज होते. शेतकऱ्यांचा दावा आहे की, मंत्र्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने आंदोलनकारी शेतकऱ्यांना चिडडले. त्यानंतर हिंसाचार उफाळला. (हेही वाचा, Priyanka Gandhi Vadra Arrested: 'वॉरंट दाखवा मगच अटक करा' उत्तर प्रदेश पोलिसांवर संतापल्या प्रियंका गांधी)

लखीमपूर हिंसाचारानंतर देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. काँग्रेस नेता प्रियंका गांधी वाड्रा (Priyanaka Gandhi Arrested) हिंसाचारग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी लखीमपूर खीरी येथे पोहोचणार होत्या. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी हरगांव येथे त्यांनाक ताब्यात घेतले. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसने ट्विट करुन माहिती दिली की, प्रियंका गांधी यांना सीतापूर पोलीस लाईन घेऊन जात आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी अवमानकारक वर्तन केले. त्यांना धक्काबुक्की झाली'. दरम्यान, प्रियंका गांधी यांनी पोलिसांना विरोध 'आगोदर वॉरंट दाखवा आणि मगच अटक करा' अशी ताठर भूमिका घेत उत्तर प्रदेश पोलिसांना जाब विचाराला.