लातूर येथील गतीमंद मुलीवर परप्रांतीय तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार पुढे आला आहे. महंमद कुरेशी (वय २४ वर्षे) असे आरोपीचे नाव असून, तो मुळचा उत्तर प्रदेशातील अलिगडचा आहे. आरोपी हा मिक्सर विकण्याचे काम करतो. घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना लातूरमधील शिराळा वांजरवाडा येथे घडली. दुपारच्या वेळी गतीमंद मुलगी घरात एकटीच होती. दरम्यान, हीच वेळ साधत आरोपी महंमद कुरेशी याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती नातेवाईकांना सांगितल्यावर घडला प्रकार पुढे आला. पीडितेच्या कुटुंबियांनी नातेवाईकांच्या मदतीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई शिरुर अनंतपाळ पोलिसांनी केली.
शिराळा वांजरवाडा परिसरात मिक्सर विकण्यासाठी आरोपी सोमवारी दुपारी (बाराच्या सुमारास) आला होता. या वेळी पाणी पिण्याच्या बहान्याने तो पीडितेच्या घरात घुसला. घरात पीडिता एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि पलायन केले. दरम्यान, मुलीसोबत घडलेला प्रकार समजताच फोनवरुन परिसरात माहिती देण्यात आली. माहितीच्या आधारे मिक्सर विकणाऱ्या तरुणाला पकडण्यात आले. आरोपी नराधमाला मुलीच्या समोर उभे केले असता मुलीने त्याला ओळखले. त्यानंतर शिरुर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.