US Presidential Election 2020: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांना रोहित पवार यांनी दिल्या शुभेच्छा; अमेरिकेतील सत्तांतराचा अंदाज खरा ठरल्यानंतर बिहारमध्येही बदलाची अपेक्षा

अमेरिकेतील सत्तांतराचा त्यांचा अंदाज खरा ठरल्यानंतर बिहार निवडणुकीच्या निकालातही असाच बदल दिसण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

रोहित पवार (फोटो सौजन्य-फेसबुक)

अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक 2020 (US Presidential Election 2020) चा अंतिम निकाल जाहीर झाला असून अमेरिकेत सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव करत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन (Joe Biden) अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. या विजयाबद्दल त्यांच्यावर सर्व जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेतील सत्तांतराचा त्यांचा अंदाज खरा ठरल्यानंतर बिहार निवडणुकीच्या निकालातही असाच बदल दिसण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे." (Joe Biden यांच्या सभेचा Sharad Pawar यांच्या सातारा सभेशी संबंध जोडत रोहित पवार यांनी बांधला अमेरिकेतही सत्तांतर अंदाज; पहा ट्विट)

Rohit Pawar Tweet:

यापूर्वी रोहित पवार यांनी अमेरिकेत सत्तांतराचा अंदाज वर्तवला होता. जो बायडन फ्लोरिडा येथे भाषण करत असताना जोरदार पाऊस सुरु झाला. तरीही न डगमडता त्यांनी भाषण सुरुच ठेवले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे सातारा येथील मुसळधार पावसातील भाषण सर्वांच्याच लक्षात आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. दोन्ही मुसळधार पावसातील भाषणांचा संबंध जोडत अमेरिकेतही सत्तांतर होईल, असा अंदाज रोहित पवार यांनी वर्तवला होता आणि तो खरा ठरला आहे. त्यामुळे आता बिहार निवडणुकीबद्दलची त्यांची अपेक्षा प्रत्यक्षात उतरते का, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.