जोपर्यंत अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल- देवेंद्र फडणवीस
फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकासआघाडीवरही सडकून टिका केली आहे.
परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या पत्रानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एकदमच ढवळून गेलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यात सत्ताधारी आणि विरोधक यांचे एकमेकांवर टिकास्त्र सुरुच आहे. दरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत 'जोपर्यंत अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहील' असे सांगितले. फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकासआघाडीवरही सडकून टिका केली आहे.
ज्युलिओ रिबेरो चांगले अधिकारी आहेत. हे हुशार आहेत. पण अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डीजी रँकचे अधिकारी गृहमंत्र्यांची चौकशी कशी करणार? असा सवाल करतानाच केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार आहे की देशमुख यांचीही चौकशी होणार आहे. त्याचा खुलासा पवारांनी करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.हेदेखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेंचे गॉडफादर- नारायण राणे
अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत. ते पदावर असेपर्यंत त्यांची चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करण्यात यावी, जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
"शरद पवारांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर मला आश्चर्यही वाटलं. पण त्यांना दोष देणार नाही. ते या सरकारचे निर्माते आहेत. निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते डिफेंड करण्याची भावना घ्यावी लागते" असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
सचिन वाझेंकडे आलिशान गाड्या सापडल्या आहेत. गेल्या सहा-आठ महिन्यात या गाड्या कोण कोण मोठे लोक वापरत होते, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.