महाराष्ट्रावर अवकाळी सावट; पुण्यात रिमझिम, नगरमध्ये तुरळक पाऊस, काही ठिकाणी वातावरण ढगाळ; शेतकरी चिंतेत

या अंदाजानुसार 27 डिसेंबर 2019 ते 2 जानेवारी 2020 या कालावधीत मध्य भारतासह उर्वरित काही प्रदेशांमध्ये पाऊस सक्रीय राहू शकतो.

Unseasonal Rains in Maharashtra | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate)

हिवाळा ऋतू (Winter Season) असतानाही आभाळ भरुन येत असल्याने आणि काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने राज्यावर (Maharashtra) अवकाळी (Unseasonal Rains) पावसाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये पुण्यात रिमझिम पाऊस पडला तर अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली. मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे आगोदरच दुष्काळ, रोगराई आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गासोबतच अवघा महाराष्ट्र अवकाळीच्या सावटाखाली आल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये पुणे शहरात आणि परिसरात रिमझिम पाऊस पडला. रिमझिम पावसाचा शिडकाव पुणे शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, सहकारनगर, फर्ग्युसन रस्ता, कॅम्प, वडगावशेरी, खराडी, मुंडवा, केशवनगर, हडपसर, खडकीसह इतर काही भागांमध्ये पाहायला मिळाला.

भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवडे म्हणजेच महिनाभराचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार 27 डिसेंबर 2019 ते 2 जानेवारी 2020 या कालावधीत मध्य भारतासह उर्वरित काही प्रदेशांमध्ये पाऊस सक्रीय राहू शकतो. पावसाची ही सक्रीयता मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात राहू शकते. या काळात आकाश अंशत: ढगाळ राहील. शिवाय येथे अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: पुणे, नागपूर, अकोलासह महाराष्ट्रात आज पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता)

दरम्यान, महाराष्ट्र आणि गोव्यातील काही ठिकाणी हवामान कोरडे असल्याची नोंदही करण्यात आल्याची माहिती हवामा विभागाने दिली आहे. यात कोकण, गोवा आणि विदर्भातील काही प्रदेशांचा समावेश आहे. 27 आणि आणि 28 डिसेंबर या दिवशी राज्यात हवामान कोरडे राहील तर 29 डिसेंबर या दिवशी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर, वर्षाखेरीच्या आदल्या दिवशी (30 डिसेंबर) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.