Unmesh Patil Quit BJP Join Shiv Sena (UBT): उद्धव ठाकरे यांचा भाजपला धक्का; उन्मेश पाटील यांचा शिवसेना (UBT) प्रवेश
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे आज (3 एप्रिल) दुपारी हा पक्षप्रवेश पार पडला.
Unmesh Patil Quit BJP: जळगाव लोकसभा मतदारसंघातील (Jalgaon Lok Sabha Constituency) विद्यमान भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश (Unmesh Patil Join Shiv Sena (UBT)) केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे आज (3 एप्रिल) दुपारी हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक पक्षनेते आणि पाटील यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व पक्ष आणि विविध क्षेत्रातील मंडळींचा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे या पक्ष प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
उन्मेश पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार असले तरी, भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीनुसार स्मीता वाघ या जळगाव येथून भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. राज्य आणि देशभरातील अनेक विद्यमान खासदारांना भाजपने तिकीट दिले असताना काही खासदारांना मात्र पुन्हा संधी मिळू शकली नाही. त्यामुळे तिकीट नाकारले गेलेल्यांच्या यादीत आपला क्रमांक आल्याने उन्मेश पाटील हे भाजप आणि नेतृत्वावर नाराज होते. त्यांनी आपली नाराजी पक्षनेतृत्वाच्या कानी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपेक्षीत यश न आल्याने त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला. अखेर आज त्यांनी शिवबंधन बांधत 'कमळा'चा त्याग केला आणि ठाकरेंची 'मशाल' हाती घेतली. (हेही वाचा, Jalgaon Lok Sabha Constituency: नाराज भाजप खासदार उन्मेश पाटील शिवसेना (UBT) च्या वाटेवर, कमळ सोडून मशाल हाती घेण्याची शक्यता)
उन्मेश पाटील शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता वारंवार बोलून दाखवली होती. दरम्यान, कालच त्यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यानंतर मातोश्रीही गाठली. प्रसारमाध्यमांनी या भेटीविषयी विचारले असता पाटील यांनी स्पष्ट बोलण्यास नकार देत तुम्हाला उद्या (3 एप्रिल) सर्व काही माहिती मिळेल, असे म्हटले होते. दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी मात्र उन्मेश पाटील हे भाजपमध्ये नाराज आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करु इच्छितात. लवकरच त्यांना शिवसेना (UBT) पक्षप्रवेश पार पडेल असे सुतोवाच कले होते. दरम्यान, उन्मेश पाटील यांनी आपल्या तमाम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मातोश्री गाठली आणि शिवबंधन बांधले.
उन्मेश पाटील यांना शिवसेना (UBT) पक्षाच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे. महाविकासआघाडीच्या जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे गटाला गेली आहे. त्यामुळे इथे पाटील यांच्या रुपात तगडा उमेदवार देण्याचा ठाकरे यांचा विचार दिसतो आहे.